Join us

कशी कराल अकरावी सीईटीची तयारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

सातत्याने उजळणी हाच पर्याय असल्याचे शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशकांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची ...

सातत्याने उजळणी हाच पर्याय असल्याचे शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची? असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर आहे. मात्र, मंडळांकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीईटी परीक्षेसाठी कोणत्या विषयांच्या किती अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात येतील, याची स्पष्टता देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता दहावीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करावी आणि तोच अभ्यासक्रम समोर ठेवून नेमका अभ्यास करण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञ देत आहेत.

सीईटीच्या परीक्षेसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी चार विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

- समाजशास्त्र, इंग्रजी या विषयांचे प्रश्न कमीत कमी वेळात सोडविता येतील, यादृष्टीने विद्यार्थ्यांनी नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाच्या प्रश्नासाठी जास्त वेळ देता येईल, असे शिक्षक सांगत आहेत.

- बहुपर्यायी उत्तरांची परीक्षा आणि प्रत्येकी २५ गुणांचे, ४ विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे असल्याने विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शाळा आणि शिक्षक अशा प्रश्नांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यासाठी मदत करू शकतात.

- याशिवाय बाजारात सीईटी परीक्षेसाठीचे प्रश्नसंचही उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर विद्यार्थी सरावासाठी करू शकतील, असे मत काही समुपदेशक व्यक्त करीत आहेत.

- विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी करताना पुस्तकांचे धडे वाचावे आणि धड्यांमधील बहुपर्यायी प्रश्न निवडावेत. सूत्र, नियम याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेची तयारी केलीच आहे, पुन्हा एकदा त्याची उजळणी करावी, असे गणिताचे शिक्षक असलेले जयेश वाघमारे यांनी सांगितले.

- विज्ञानाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सुत्रांची उजळणी वारंवार करावी आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी माहिती विज्ञान शिक्षिका शर्मिला राजगुरे यांनी दिली.

- अकरावी प्रवेशसाठीची परीक्षा पहिल्यांदाच होत असल्याने विद्यार्थी आणि पालक गोंधळणे साहजिकच आहे. शिवाय अकरावी प्रवेशासाठी यावरून गुणवत्ता ठरविली जाणार असल्याने काठिण्य पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाची परीक्षा समजूनच ही परीक्षा दिली, तर हेही त्यांना अपेक्षेप्रमाणे सहजच शक्य होईल, असे मत समुपदेशक व्यक्त करीत आहेत.