'संजू' सिनेमासाठी रणबीर कपूरने केली अशाप्रकारे तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 02:54 PM2018-06-20T14:54:44+5:302018-06-20T14:54:44+5:30
बॉलिवूडचा चार्मिंग बॉय रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मुंबई - बॉलिवूडचा चार्मिंग बॉय रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील रणबीरचा लूक संजयशी किती मिळताजुळता आहे, याची झलक आपण चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीजरमध्ये दिसली आहे. पण रणबीरसाठी हे दिसते तितके सोपे नक्कीच नव्हते. स्वत:ला संजयच्या व्यक्तिरेखेत फिट बसवण्यासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली आहे. अगदी संजयचे हावभाव, त्याची चाल, त्याच्या वागण्यातील अनेक बारकावे टिपण्यापासून ते त्याच्यासारखी शरीरयष्टी बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी रणबीरने केल्या आहेत. या भूमिकेसाठी रणबीरला एकदा वजन घटवावे लागले तर एकदा वाढवावे लागले. होय, रणबीरने सर्वात आधी १० किलो वजन कमी केले. संजयच्या आयुष्याचा सुरुवातीचा टप्पा शूट करण्यासाठी त्याला हे वजन कमी करावे लागले. यानंतर संजयच्या आयुष्याचा दुसरा टप्पा चित्रीत करण्यासाठी रणबीरने पुन्हा १५ किलो वजन वाढवले. साहजिकच रणबीरची ही मेहनत कामी आली, असे म्हणायला हरकत नाही.
'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', संजय दत्तवर ऋषी कपूर संतापले
संजू या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी संजयच्या सवयी रणबीरने आत्मसात केल्या आहेत. त्याचसोबत संजयच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने आपल्याशा केल्या आहेत. संजयला परफ्युम खूप आवडतात. तो नेहमी एकाच कंपनीचे परफ्युम वापरतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून संजयने देखील हाच परफ्युम वापरायला सुरुवात केली आहे. संजयची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आपल्याशा करणे गरजेचे होते असे रणबीर सांगतो.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांशी अबोला अशा अनेक घटना या चित्रपटात दाखविल्या जाणार आहेत. या बायोपिकमध्ये मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत.