Join us

शिक्षकांचा लोकल ‘ताप’ कायम, शाळेत पोहोचायचे तरी कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:09 AM

अनलॉकच्या नवीन नियमानुसार लसीचे २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा असली तरी अनेक शिक्षकांचे अद्यापही संपूर्ण लसीकरण नसल्याने त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसणारच हे स्पष्ट आहे.

मुंबई : राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी शिक्षकांचा लोकल ''ताप'' कायम असल्याने, त्यांना अद्यापही लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शाळेत पोहचण्यासाठीची लोकल प्रवासाची अडचण कायम आहे. अनलॉकच्या नवीन नियमानुसार लसीचे २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा असली तरी अनेक शिक्षकांचे अद्यापही संपूर्ण लसीकरण नसल्याने त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसणारच हे स्पष्ट आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर शिक्षकांनी दंड भरूनच प्रवास करायचा का असा संतप्त सवाल शिक्षक करीत आहेत.शाळा सुरु होणार असल्याने मात्र शिक्षकांचे लसीकरण पूर्ण नसल्याने शिक्षकांसमोर आणि मुख्याध्यापकांसमोर शाळा उपस्थितीचे मोठे संकट उभे राहिले आहे. या आधी वारंवार शिक्षण विभागाकडे मागण्या आणि निवेदने देऊनही शिक्षक , मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी याना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. आता ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांनाच लोकल प्रवासाचाही परवानगी मिळणार आहे.  लसीचे दुसरे डोस अद्याप अनेक शिक्षकांनी घेतले नसल्याने ते लोकल प्रवासासाठी पात्र ठरू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत  शिक्षकांनी कसे उपस्थित रहायचे असा प्रश्न मुख्याध्यापक विचारत आहेत. लसीकरण झाल्यास प्रश्न सुटणारसध्यस्थितीत मुलांच्या लसीकरणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीत शिक्षकांचे लसीकरण महत्त्वपूर्ण असून शाळा सुरु होण्याआधी राज्यातील सरसकट सगळ्या शिक्षकांचे प्राधान्याने अगदी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून लसीकरण पूर्ण व्हावे अशी मागणी ही मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी केली आहे. शिक्षण विभाग आणि प्रशासन यांनी समन्वय साधत शिक्षकांचे याचा निर्णय घ्यावा , नियोजन करावे आणि मग शाळा सुरु होण्यासंदर्भात निर्णय जाहीर करावा अशी प्रतिक्रिया केंगार यांनी दिली. अन्यथा सरसकट सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी याना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक , मुख्याध्यापक करत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई लोकल