Join us

लॉकडाऊन असताना पाठ्यपुस्तके परत करणार तरी कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:06 AM

लाॅकडाऊनमुळे शाळा बंद; तरीही मुंबईतून १५ हजार पुस्तकाचे संच शाळांकडून परत जमा होणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पर्यावरणाच्या ...

लाॅकडाऊनमुळे शाळा बंद; तरीही मुंबईतून १५ हजार पुस्तकाचे संच शाळांकडून परत जमा होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच खर्च वाचवण्याच्या दृष्टीने पाहिले तर आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पुस्तकांची छपाई यंदा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत; परंतु लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्यामुळे आणि परीक्षा रद्दनंतर विद्यार्थी स्थलांतरणामुळे पुस्तके परत कशी करणार, हा प्रश्न पालकांपुढे तर ती परत घ्यायची तरी कशी, असा प्रश्न शाळांपुढे आहे. याच कारणास्तव मुंबई जिल्ह्यात पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये अद्याप तरी कोणतीही पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत मिळू शकली नसल्याची माहिती मिळाली आहे. याउलट उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील ५ वी ते ८ वी च्या शाळांमधून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक पुस्तके परत मिळणार आहेत.

शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहीत धरून यंदा सुस्थितीतील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतले जाणार आहेत.

दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. निकालही लागला नाही. परिणामी, पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन जसे पुस्तक वाटप केले तसेच पुस्तके परतही घेण्याचे ठरविले तरी सध्या कोरोनाकाळ असल्याने ते किती शक्य आहे, हा प्रश्न असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. याउलट उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील शाळांनी किती पुस्तके जमा झाली आहेत, त्याची माहिती नोंदविली असून मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हा आकडा वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

* पालक म्हणतात.....

माझ्या मुलाला दिलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामात यावीत, त्यांनीही शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे यासाठी शाळांनी पुस्तके मागितलेली आहेत. मात्र, मुंबईतील परिस्थिती सगळ्यांनाच माहिती असल्याने पुस्तके परत करण्यासाठी शाळा सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.

- मिलिंद ब्रम्हे, पालक

-----

पुस्तक पुनर्वापराचा पर्याय अगदी योग्य आहे, मात्र तो यंदाच्या लॉकडाऊनमध्ये कितपत शक्य आहे, अशी शंका आहे. यंदा ऑनलाइन शिक्षणामुळे असाही पुस्तकांचा वापर कितपत आणि कसा झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, ती परत करण्यासाठी शिक्षण विभागाने वेळ वाढवून द्यावी.

- सुचित्रा मेंढे, पालक

------

मागील वर्षी झालेले पुस्तक संच वाटप -

पालिका शिक्षण विभाग - १७४९६७०

दक्षिण विभाग - ४५११३२

उत्तर विभाग - ५५७३७५

पश्चिम विभाग - ६९५७६६

एकूण - ३४५३९४३

----

उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील जमा होणारे पाठ्यपुस्तक संच

पाचवी - ३५८२

सहावी - ३७५७

सातवी -३८७६

आठवी - ४११६

एकूण - १५३३१

* यंदा पुस्तकांच्या मागणीत घट होण्याची शक्यता

पुस्तकांची शैक्षणिक वर्षातील मागणी ही त्यांच्या मागील वर्षीच्या यूडायस मधील एकूण विद्यार्थी संख्येनुसार होत असते. यंदा या मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचा पूर्ण अभ्यास हा ऑनलाइन पद्धतीने झाल्यामुळे पुस्तकांचा किती आणि कसा वापर केला गेला आणि ती सुस्थितीत असतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थी संख्येतही ही घट होण्याची शक्यता असल्याने मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

..............................