तीन महिन्यांच्या पगारात घर कसे चालवायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:47 AM2021-01-05T01:47:26+5:302021-01-05T01:47:41+5:30

५० स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल

How to run a house on three months salary? | तीन महिन्यांच्या पगारात घर कसे चालवायचे?

तीन महिन्यांच्या पगारात घर कसे चालवायचे?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे, परंतु आधीच पगार कमी, त्यात हक्काचे घर अद्याप नाही, मुलांच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे, पत्नी घरीच असते, असे एक ना अनेक प्रश्न आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांपुढे उभे ठाकले असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. तीन महिन्यांच्या पगारात घर कसे चालवायचे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.


मुंबईत एसटीचे तीन डेपो आहेत.  कर्मचारी, अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. एसटीचे पगार कमी, त्यात ते पगारही वेळेवर मिळत नाहीत. भत्ते असून नसल्यासारखे आहेत. 
पगार दिसताना दिसतो, पण हातात येताना तो कापूनच येतो. पाच ते सहा वर्षे सेवा  राहिली आहे. मात्र, या सर्व बाबींना कंटाळून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तर मला स्वेच्छानिवृत्ती घेण्यामागे वैद्यकीय कारण आहे. माझ्यावर दोन-तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. गाडी चालवताना मुलाला सोबत घेऊन जावे लागते. आणखी तीन-चार वर्षे हा त्रास सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?
स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर हातात १५ ते २० लाखांच्या आसपास रक्कम पडणार आहे. ती कर्ज फेडण्यातच जाणार आहे. पुढील आयुष्य कसे जगायचे, मुलांचे शिक्षण झाल्यावर त्यांचे लग्न कसे करायचे, असे अनेक प्रश्न आमच्यापुढे आहेत, असे मुंबई विभागातील एसटी कर्मचाऱ्याने सांगितले. 

एसटीमध्ये काम हे दगदगीचे आहे. सातत्याने धावपळ होत असते. एसटी महामंडळाने खूप काही दिले आहे; पण आता कुटुंबाला वेळ द्यायला हवा. माझी पाच वर्षे बाकी आहेत; पण स्वेच्छानिवृत्ती घेत आहे. पण स्वेच्छानिवृत्तीनंतर बाकीच्या वर्षासाठी तीन महिन्यांचे वेतन मिळणार आहे ते पुरेसे नाही. त्यामध्ये वाढ करण्यात यावी.
    - एसटी कर्मचारी, 
मुंबई विभाग


स्वेच्छानिवृत्ती घेतली तर मिळणाऱ्या पैशांतून पुढे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न असतो. वर्षभराचा खर्च तीन महिन्यांच्या वेतनात भागविणे शक्य नाही. त्यामध्ये वाढ केल्यास घर चालविणे सोपे होईल. 
- एसटी 
कर्मचाऱ्याची पत्नी

Web Title: How to run a house on three months salary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.