Join us

घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:10 AM

मुंबईत महिला अत्याचाराचा आकडा चढाच...निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटांवर धाकधूक कायममुंबईत महिला अत्याचाराचा आकडा चढाच...निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटांवर धाकधूक ...

मुंबईत महिला अत्याचाराचा आकडा चढाच...निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटांवर धाकधूक कायम

मुंबईत महिला अत्याचाराचा आकडा चढाच...निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटांवर धाकधूक कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद होणाऱ्या महिला अत्याचाराच्या चढ्या आलेखामुळे घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती? असा प्रश्न कुटुंबीयांना पडत आहे. हीच भीती लक्षात घेत मुंबईतील निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटा आणि रोडरोमिओ मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यानुसार उपाययोजनाही करण्यात येत आहे.

एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून त्यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. महिलांविरोधी गुन्ह्यात दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२), तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. नागपूर शहरात १,१४४ गुन्हे नोंद झाले. मुंबईतला दोषसिद्धी दर ३० टक्क्यांवर आहे.

मुंबईतील आजही काही ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी रात्रीच्या सुमारास एकटे जाण्यास तरुणी, महिलांच्या मनात धाकधूक असते. यातूनच प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत, ज्या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत. त्या ठिकाणांची माहिती घेत त्यानुसार गस्तीची आखणी तयार करण्यात येत आहे.

झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, कॉलेज कॅम्पस, थिएटर, मॉल्स, बाजारपेठा, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांकडे जाणारे भूमिगत मार्ग, याशिवाय ज्या ठिकाणी लोकांची कमी वर्दळ असेल त्यांना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने मदत मागितली तर, तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत केली जाईल. पोलीस ठाण्याच्या परिसरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांची गस्त घालताना भेट घेऊन त्यांची अडचण समजून घेतली जाणार आहे.

....

बलात्कार, छेडछाडीच्या गुन्ह्याचा आलेख चढाच...

गेल्या ८ महिन्यात मुंबईत बलात्काराचे ६१९ गुन्हे नोंद आहेत. तर ७२३ जणींंच्या अपहरणाची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यात दोनशेने वाढ झाली आहे. तर विनयभंगाच्या १,२६९ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी १ हजार ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

.....

येथे संपर्क करा...

कोणी छेड काढत असल्यास मुंबई पोलिसांच्या १०० , १०३ या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत मिळेल.

....

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा कक्ष स्थापन केले जाणार आहेत. सोबतच निर्भया पथकांतर्गत महिला सुरक्षेचे विविध उपक्रम सुरू केले जाणार आहे.

....

गुन्हेगारांंमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे हा उद्देश...

शाळा, महाविद्यालय तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला, तरुणींची प्रत्यक्ष किंवा मेसेज ई-मेल व इतर सोशल मीडियाचा वापर करून छेड काढली जाते. समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करत अशा सर्व गुन्ह्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात येत असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

....

या ठिकाणी धाकधूक...

मुंबईतले मालाड लिंक रोड, विविध स्कायवॉक, सबवे, झोपडपट्टी लगत असलेले परिसर रात्रीच्या वेळेस मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत असल्यामुळे अशा ठिकाणी छेडछाडी, चोरीच्या घटनांची भर पडतानाही दिसत असल्याचे काही तरुणींचे म्हणणे आहे.