तुमची लिफ्ट किती सुरक्षित?

By मनोज गडनीस | Published: November 13, 2022 01:31 PM2022-11-13T13:31:01+5:302022-11-13T13:31:30+5:30

इमारतीचा अथवा सोसायटीचा मॅनेजर किंवा सुरक्षारक्षक या दोघांनाही लिफ्ट कंपनीकडून लिफ्ट सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत ते आपल्याला लिफ्टमधून सुरक्षित बाहेर काढू शकतात.

How safe is your elevator? | तुमची लिफ्ट किती सुरक्षित?

तुमची लिफ्ट किती सुरक्षित?

Next

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी 
लिफ्टमध्ये अडकल्याने वा लिफ्ट कोसळल्याने दोन महिलांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटना गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये घडल्या. गेल्या वर्षी वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. आजच्या घडीला मुंबईत काही तुरळक वगळता सर्वच इमारतींमध्ये लिफ्ट आहे. मात्र, लिफ्टमध्ये होणाऱ्या या दुर्घटनांमुळे लिफ्टच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घर असो वा कार्यालय, आपण दिवसातून अनेकदा ज्या लिफ्टचा वापर करतो ती किती सुरक्षित आहे?

लिफ्ट सुरक्षेचे नियम काय? 
लिफ्ट कोसळणे, दोन मजल्यांच्या मध्येच अडकणे आणि अडकल्यामुळे त्यातील लोकांच्या जीवाचा कोंडमारा होणे, अशा बातम्या सातत्याने कानावर येत असतात. मात्र, लिफ्टच्या सुरक्षेसंदर्भात २०१४ मध्ये भारताने काही निकष स्वीकारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या निकषांचे पालन केले जाते तेच हे निकष आहेत. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच ती लिफ्ट वापरण्यासाठी योग्य आणि सुरक्षित असल्याचे मानले जाते. 

का होतात अपघात? 
अनेक लिफ्ट जुन्या झालेल्या असतात. त्यांची नियमित तपासणी केली नाही, तर अपघाताची शक्यता जास्त असते.
यामध्ये प्रामुख्याने लिफ्टचा वेग, लिफ्टचे दार व्यवस्थित बंद होणे, लिफ्टच्या हालचालीसाठी लावलेला लोखंडी दोर सुस्थितीत आहे अथवा नाही तसेच ज्या चक्रावरून तो दोर फिरतो ते चक्र सुस्थितीत आहे अथवा नाही, त्याच्या सुरळीत हालचालीसाठी त्यात नियमित वंगण घातले आहे की नाही, लोखंड अधिक असल्यामुळे त्याला कुठे गंज चढला नाही ना, याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
लिफ्ट मध्येच थांबत असेल किंवा मजला पूर्ण होण्याच्या आतच दरवाजा उघडला जात असेल किंवा मजल्यादरम्यान अडकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने त्याचा मेन्टेनन्स करणे गरजेचे आहे.

सुरक्षेचे निकष काय आहेत? 
 लिफ्ट इमारतीमध्ये कायमस्वरूपी अशा 
जागी असावी.
 तिथे जवळपास विजेचे युनिट असावे.
 लिफ्ट आगीपासून सुरक्षित असावी.

इमारतीत किती मजले आहेत, लिफ्ट किती मजल्यांवर थांबणे अपेक्षित आहे, तळमजला ते सर्वांत वरचा मजला हे अंतर लिफ्ट किती वेळात पार करू शकते, त्याची वेग मर्यादा काय, त्या लिफ्टच्या वजनाची मर्यादा काय आणि वजन मर्यादा आणि वेळ मर्यादा यांचे समीकरण साधले गेले आहे का, याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

लिफ्टची नियमित तपासणी होते का? 
 लिफ्टची नियमित तपासणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
 आजच्या घडीला अशा अनेक इमारती आहेत ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे.
 तेथील लिफ्टची रचना आणि तंत्र दोन्ही जुने आहेत.
 त्यामुळे त्या जागी नवीन तंत्राने सुसज्ज लिफ्ट लावणे चांगले, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

लिफ्टमधून सुरक्षित प्रवास कसा करावा? 
ज्या लिफ्टमध्ये आतील व बाहेरील दोन्ही दरवाजे हे लोखंडी जाळीचे आहेत, त्यांनी लिफ्टमधून जातेवेळी दोन्ही दरवाजे नीट लावून घ्यावेत.
ते दोन्ही दरवाजे ज्या खाच्यामध्ये अडकतात त्यात वंगण आहे की नाही त्याची नियमित तपासणी करून घ्यावी.
समजा तुम्ही लिफ्टमध्ये आलात आणि बाहेरील दरवाजा अर्धवटच बंद झाला असेल तर अशावेळी आतील दरवाजा बंद करून त्यामधील फटीतून हात घालत बाहेरचा दरवाजा लावू नये. कारण जर अशावेळी बाहेरचा दरवाजा बंद झाल्या झाल्या लिफ्ट सुरू झाली तर अपघात संभवतो.
ज्या लिफ्ट बंद स्वरूपाच्या म्हणजे दरवाज्यांच्या आहेत त्या लिफ्टमध्ये इंटरकॉम अर्थात फोनची सुविधा असणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही अशा लिफ्टमध्ये मध्येच अडकलात तर त्या लिफ्टमधून तुमच्या इमारतीच्या सुरक्षा चौकीशी संपर्क साधत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती तुम्हाला कळविता येते.
हा फोन सुरू आहे अथवा नाही, याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. 
 


 

Web Title: How safe is your elevator?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई