वयात येणाऱ्या मुलींशी पालकांचा संवाद कसा असावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:41 AM2024-04-14T10:41:11+5:302024-04-14T10:46:35+5:30
पौगंडावस्था हा एक आव्हानात्मक काळ असतो.
डॉ. शुभांगी पारकर अधिष्ठाता, वेदांता कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स
पौगंडावस्था हा एक आव्हानात्मक काळ असतो. यौवनात शारीरिक बदल घडताना भावनिक परिवर्तनही बदलते. यातील काही सामाजिक बदल हे मुलांच्या प्रौढ स्वतंत्र अस्तित्वाकडे वाटचाल करण्याच्या अत्यावश्यक प्रक्रियेचा भाग आहे. दुर्दैवाने, दोन्ही पालक आणि किशोरवयीन मुले या काळात संवाद साधण्यासाठी संघर्ष करतात. एक किशोरवयीन मुलगी असणे हा खरेतर चढ-उतारांनी भरलेला खडतर प्रवास आहे आणि त्यांचे पालक असण्याबद्दलही आपल्याला असेच म्हणता येईल. किशोरवयीन वर्षे अनेक प्रकारे आव्हानात्मक असू शकतात. शारीरिक बदल, शैक्षणिक तणाव, समवयस्कांचा दबाव, भावनिक आणि रासायनिक बदल हे या पायाभूत वर्षांना प्रश्नांकित करणारे काही मुद्दे आहेत. हे साध्य करण्याचे काही मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
पालकांनी आपली कन्या आता लहान राहिलेली नाही, ती किशोरवयीन आहे आणि तिच्या स्वतःच्या अशा वेगवेगळ्या इच्छा आहेत, हे सत्य स्वीकारले पाहिजे. त्यांना लहान मुलासारखे वागवू नये. तथापि, किशोरवयीन मुले पूर्णपणे प्रौढ नसतात आणि त्यांना प्रौढ म्हणून जबाबदार धरले जाऊ शकत नाही. किशोरवयीन मेंदू विकासाच्या टप्प्यावर मध्यभागी आहे आणि किशोरवयीनांना त्यांच्या जीवनाच्या या टप्प्यावर तुमची मदत आवश्यक आहे. ते त्यांच्या निर्णय क्षमतेत, तर्कशक्तीमध्ये किंवा भावनिक व्यवस्थापनात फारसे विकसित झालेले नाहीत. ते प्रौढांसारखे शहाणपणाने वागतील आणि गंभीरपणे विचार करतील, असे गृहित धरण्याऐवजी काहीवेळा समंजसपणे वागू शकतात आणि हेकेखोरपणा करू शकतात हे लक्षात घ्या.
मर्यादा स्पष्ट करा
तिला विकासासाठी स्वतःची जागा द्या. पण प्रेमाने मर्यादा स्पष्ट करा. हे लक्षात ठेवा की, ती कधीकधी तुमची परीक्षा पाहू शकते, तेव्हा तिला तुम्ही आखून दिलेल्या सीमांची पुन्हा आठवण करून द्यावी लागेल. तुम्ही तुमच्या मुलीच्या कपड्यांच्या निवडीशी असहमत असल्यास, तिला समोरासमोर सांगा. समंजसपणाही दाखवा. कपडे सूचक कसे असू शकतात आणि लोक काही प्रकारच्या कपड्यांबाबत काही गोष्टी कशा गृहीत धरू शकतात, या सामाजिक समस्यांबद्दल तिच्याशी संवाद साधा.
विश्वासावर लक्ष केंद्रित करा
तुम्ही तिच्या विश्वासावर लक्ष केंद्रित करा, संशयावर नाही. हे खरे आहे की, काही कारणाने किशोरवयीन मुले खूप अडचणीत येऊ शकतात. परंतु, त्यांनी भूतकाळात विश्वासघात केला असेल, तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवणे तुमच्या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. कुठल्याही निष्कर्षावर जाण्याऐवजी प्रश्न विचारा. तुम्हाला खात्री नसल्यास, त्यांना समजू द्या की, मला याबाबत तुमच्यावर विश्वास ठेवायचा असल्याने सगळे जाणून घेणे कसे महत्त्वाचे आहे. सहानुभूती बाळगा, त्यामुळे विश्वास वाढतो आणि तुमचे नाते मजबूत होण्यास मदत होते.
खुल्या संवादाला प्रोत्साहन द्या
तुमच्या मुलीशी चांगला संवाद विकसित करा. किशोरवयीन मुलींना नेहमी समवयस्क मुलांशी (किंवा मुली) संवाद ठेवण्याची इच्छा असते, मग ती फक्त मैत्री असो किवा प्रेमात पडण्याची आस. तुमची मुलगी जर तुमच्याबरोबर खुलेपणाने वागत असेल, तर ती तुम्हाला नवीन मित्र बनविल्यानंतर किंवा एखादा विशिष्ट व्यक्ती आवडल्यावर सांगेल. अशावेळी तिला जाणून घ्या, ती तुम्हाला काय सांगते यात रस घ्या. चिंतित होऊ नका किंवा रागावू नका. तिला त्या व्यक्तीबद्दल विचारा किंवा त्यांना भेटायला सांगा. मग तिने त्यांच्यासोबत बाहेर जायचे का किवा दीर्घकाळ मैत्री करायची की नाही ते ठरवा. आपण नेहमी सहमत असलो किंवा नसलो, तरीही त्यांच्या भावना स्वीकारा.
स्वातंत्र्याचा विचार
मुलीच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि सवयी समजून घेऊन लवचिक व्हा. जर तुमची कन्या समजूतदार असेल आणि जबाबदारीची जाणीव दाखवत असेल, तर तिला अधिक स्वातंत्र्य द्या. जर ती चुकीची किवा वाईट निवड करत असेल, तर अधिक बंधने घाला. शेवटी तिला समजून सांगा की, तिच्या आवडीनिवडी आणि वर्तन कसे आहे? यावर तिला पालकांकडून किती स्वातंत्र्य मिळेल किंवा किती निर्बंध लागतील हे ठरेल. जर किशोरवयीन मुलीना तुम्ही नाही म्हणण्यास इच्छुक असाल, तरीसुद्धा त्यांचे पूर्ण ऐका, मला हे आवडत नाही, कारण यात तुझ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असे तिला सांगा.