विमानतळाजवळ इमारती किती उंचीच्या असाव्यात?
By admin | Published: September 1, 2016 05:49 AM2016-09-01T05:49:56+5:302016-09-01T05:49:56+5:30
विमानतळ परिसरातील इमारतींची उंची किती असावी? या संदर्भात काय निर्बंध घालण्यात आले आहेत, याची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत.
मुंबई : विमानतळ परिसरातील इमारतींची उंची किती असावी? या संदर्भात काय निर्बंध घालण्यात आले आहेत, याची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ कायद्याचे उल्लंघन करून, अनेक उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींमुळे
विमान अपघात होऊ शकतो
आणि हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनयाचिका व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे
व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा असलेल्या सुनिता सोसायटी पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले होते, तसेच उच्च न्यायालयाने महापालिका, विमानतळ प्राधिकरण, डीजीसीएला आतापर्यंत रहिवाशांना बजावलेल्या नोटीसवर काय कारवाई करण्यात आली आहे, याची तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
‘विमानतळाच्या परिसरात किती उंचीच्या इमारती बांधण्यात याव्यात? उंचीची मर्यादा काय आहे? याची माहिती आम्हाला द्या. कायद्याचे उल्लंघन होत असल्याने, विमान प्रवाशांबरोबरच रहिवाशांचाही
जीव धोक्यात येऊ शकतो,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली. (प्रतिनिधी)