म्हाडाची महागडी घरे कशी परवडणार? आवाक्याबाहेरील किमतींवरून मुंबईकरांचा टीकेचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:27 AM2024-08-11T06:27:34+5:302024-08-11T06:27:56+5:30

बाजारभावापेक्षा किमती कमीच असल्याचे गृहनिर्माण अभ्यासकांचे मत

How to afford the expensive houses of Mhada? The tone of criticism from Mumbaikars over the unaffordable prices of flats in Sodati | म्हाडाची महागडी घरे कशी परवडणार? आवाक्याबाहेरील किमतींवरून मुंबईकरांचा टीकेचा सूर

म्हाडाची महागडी घरे कशी परवडणार? आवाक्याबाहेरील किमतींवरून मुंबईकरांचा टीकेचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाने विक्रीसाठी काढलेल्या २०३० पैकी बहुसंख्य घरांच्या किमती ३४ लाखांहून अधिक आहेत, तर उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमतींनी कोट्यवधींची मजल मारली आहे. सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या अत्यल्प गटातील मुंबईकरालाही ३४ लाखांचे घर परवडणार नाही. त्यामुळे परवडणारी घरे देणारी सरकारी संस्था असे बिरूद मिरवणाऱ्या म्हाडावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे.

म्हाडाने बांधलेल्या घरांपैकी सर्वाधिक किंमतीचे घर एक कोटी ७८ लाख रुपयांचे आहे. हे घर उच्च उत्पन्न गटासाठी आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला कमीतकमी किंमत असलेले २९ लाखांचे घर कसे परवडेल? त्याला बँक कर्ज देईल का? असे उपस्थित केले जात आहेत. म्हाडाने मात्र घरांच्या किमतींचे समर्थन केले आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी असून, काही ठिकाणी या घरांचे बाजारमूल्य अंदाजे ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे, असा दावा म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने केला.

दुसरीकडे, मुंबई शहरातील घरांच्या किंमती कोट्यवधी रुपये आहेत. त्या घरांची मार्केट व्हल्यू रेडीरेकनर दरापेक्षा दुप्पट आहे. खासगी बिल्डरांनी बांधलेल्या घरांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे त्यांची घरे सामान्य मुंबईकरांना परवडणारी नाहीत, असाही युक्तिवाद म्हाडा अधिकारी करतात. मुंबई शहरातल्या घरांचा एरिया कमी असला तरी किमती जास्त आहेत या किमती त्या त्या परिसरानुसार निश्चित होतात, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

घराची किंमत कशी ठरते?

गृहप्रकल्पांच्या एकूण किमतीवर घरांचे मूल्य अवलंबून असते, निश्चित केले जाते. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, सिमेंटचे वाढते दर, रेडी रेकनरदर, परिसर आदी गोष्टींचा विचार केला जातो. म्हाडाच्या घरांच्या किमती इंजिनीअरकडून अंतिम केल्या जातात.

‘पीएमआवास’चे घर ३४ लाख रुपयांना

प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख अनुदान मिळते. एक लाख राज्याकडून आणि दीड लाख केंद्राकडून. गोरेगाव येथे या योजनेमधील घरे आहेत. गेल्या वर्षी या घरांची किंमत ३० लाख रुपये होती. यावर्षी ३४ लाख आहे. ही किंमत अनुदानासह आहे.

बाजारभावापेक्षा किमती कमीच!

गोरेगावमध्ये म्हाडाच्या घराची किंमत आणि खासगी बिल्डरच्या घराची किंमत यात खूप फरक आहे. गोरेगावात एक कोटीच्या खाली घर मिळणे कठीण आहे. तेथे ३४ लाखांत घर मिळत असेल तर बाजारभावाच्या तुलनेत ते परवडणारे आहे. कारण ते कमी किमतीचे आहे. सहा लाखांचे उत्पन्न असेल तर पाच किंवा सहापटप्रमाणे म्हाडाची घरे परवडणारी आहेत. थोडक्यात बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किमती कमी आहेत. म्हणून ती घरे तुलनेने परवडणारी आहेत.
-रमेश प्रभू, गृहनिर्माण अभ्यासक

Web Title: How to afford the expensive houses of Mhada? The tone of criticism from Mumbaikars over the unaffordable prices of flats in Sodati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.