Join us

आत्महत्या कशी करायची?, युवकानं केलं Google सर्च; काही मिनिटात 'असं' काही घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 1:11 PM

गुगलवर युवकाने विना वेदना आत्महत्या कशी करायची हे शोधत होता.

मुंबई - सध्याच्या काळात मानसिक तणावाखाली येत अनेक तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. भारतात दरदिवशी कुणी ना कुणी आत्महत्या करत असते. आत्महत्या कशी करावी हेदेखील इंटरनेटवर शोधले जाते. परंतु मुंबईतल्या एका तरुणानं गुगलवर विना वेदना आत्महत्या कशी करायची हे सर्च केले आणि काही मिनिटांनी जे काही घडले त्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. गुगलची सतर्कता आणि मुंबई पोलिसांची तत्परता यामुळे २५ वर्षीय तरुणाचा जीव वाचला आहे. 

मुंबई पोलिसांनी २५ वर्षीय युवकाचा शोध घेत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. अमेरिकन एजेन्सीकडून मिळालेल्या अलर्टनंतर या युवकाचा शोध घेण्यात आला जो गुगलवर विना वेदना आत्महत्या करण्याचा पर्याय शोधत होता. या मुलाचा शोध घेतल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. यूएस नॅशनल सेंट्रल ब्यूरो इंटरपोलद्वारे आयपी एड्रेस आणि लोकेशन मिळालेल्यानंतर दुपारी मुंबईच्या कुर्ला परिसरात आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकाचा शोध लागला आणि पोलिसांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी वेगाने पाऊले उचलली. 

जोगेश्वरीला राहणारा आणि खासगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या युवकाने शिक्षणासाठी आणि अन्य कारणासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या काही महिन्यापासून तो घरकर्जाचा हफ्ता भरला नव्हता त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. याच परिस्थितीमुळे युवकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो ऑनलाईन आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत होता. 

गुगलवर युवकाने विना वेदना आत्महत्या कशी करायची हे शोधत होता. तेव्हा अमेरिकेतील एजेन्सीनं नवी दिल्लीतील इंटरपोल कार्यालयाला याची सूचना दिली. त्यानंतर दिल्लीतून मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या युवकाचा शोध घेतला आणि त्याला गाठले. त्यानंतर युवकाला ताब्यात घेत त्याचे समुपदेशन करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, युवकाने याआधीही ३-४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. समुपदेशनानंतर युवकाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आणि तरुणावर योग्य ते उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :गुगलमुंबई पोलीस