मुंबई : निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरूपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
व्यासपीठावर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, एमआयडीसी, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष वरीक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक देवीदास गोरे, कार्यक्रमाचे संयोजक आणि किंग्ज एक्स्पो मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता, भारत पेट्रोलियमचे अग्नी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख अरुणकुमार दास उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘किंग्ज एक्सलन्स पुरस्कार’ २१ जणांना, ‘सेफ इंडिया हीरो प्लस पुरस्कार’ ५९ जणांना, ‘सेफ टेक काॅर्पोरेट पुरस्कार’ ३ जणांना, ‘सेफ्टी प्रूफ पुरस्कार’ ३८ जणांना प्रदान करण्यात आले.
शासनसुद्धा कामगार मंत्रालयातून कामगारांना सुरक्षित साधनांची संच देण्यात येतो. आतापर्यंत ४० लाख नोंदणीकृत बांधकाम व संघटित कामगारांना अशा संचाचे वितरण शासनाने केले आहे. त्यात हातमोजे, सुरक्षा जाकीट, हेल्मेट, सुरक्षा पट्टा, बूट, बॅटरी इत्यादी सुरक्षा साहित्य प्रत्येक कामगाराला मोफत देण्यात आल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.