परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 09:38 AM2024-02-19T09:38:55+5:302024-02-19T09:40:28+5:30
दहावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई : दहावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती आकृत्या पेनाऐवजी पेन्सिलने काढल्या म्हणून विद्यार्थ्यांचा अर्धा गुण कापायचा की नाही, याबद्दल पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
पेपर तपासणारे शिक्षक पेनाने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापतात. आकृती पेनाने काढावी अशी सूचना प्रश्नपत्रिकेत आहे. मात्र, पेन्सिलने आकृती काढलेली असल्यास अर्धा गुण कापावा, अशा सूचना नाहीत. मग हे गुण का कापले जातात, असा प्रश्न काही पर्यवेक्षक, मॉडरेटर करत आहेत. त्यांनी पेन्सिलने आकृती काढल्यास गुण कापण्याचे काहीच कारण नाही, अशी भावना ‘फारूक हायस्कूल’चे शिक्षक व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी व्यक्त केली. शेख यांनी मंडळाला पत्र लिहून गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे.
मुले आकृतीसाठी पेन्सिल का वापरतात?
पेनाने काढलेल्या आकृतीमुळे शाई उत्तरपत्रिकेवर पसरून पेपर खराब होण्याची शक्यता असते.
शिवाय पट्टीला पेनाची शाई लागल्याने ती खराब होते.
वारंवार पेनाने रेघा ओढल्यानंतर ते नीट चालेनासे होते.
पेनाने तयार केलेल्या आकृतीत दुरुस्ती करता येत नाही.
नेमका विषय काय?
दहावीच्या परीक्षेत भाषा विषयात परिच्छेदवर आकलन कृती विचारण्यात येते. त्यासाठी चौकट किंवा इतर आकृती बनवून त्यात उत्तरे लिहिणे अनिवार्य असते. प्रश्नपत्रिकेत आकृत्या पेननेच काढाव्या, असे नमूद असते.परंतु, पेन्सिलने आकृती काढल्यास काही परीक्षक उत्तर बरोबर असूनही अर्धा गुण कापतात.
ते उत्तर बोर्ड ग्राह्य धरत नाही :
विद्यार्थी आकृती पेन्सिलने काढू लागले तर उत्तरही पेन्सिलनेच लिहिण्याची शक्यता आहे आणि पेन्सिलने लिहिलेले उत्तर बोर्ड ग्राह्य धरत नाही. परंतु, आकृत्या पेन किंवा पेन्सिलने काढू शकतात. उत्तर मात्र पेनानेच असणे अनिवार्य आहे.
संभ्रम काय :
प्रश्नपत्रिकेत किंवा परीक्षकांना कुठेही अशी सूचना देण्यात आलेली नाही की, विद्यार्थ्यांनी पेन्सिलने तयार केलेल्या आकृतीस प्रत्येकी प्रश्नांना अर्धा गुण कमी करावा. तरीही काही पर्यवेक्षक आणि मॉडरेटर अर्धा गुण कापतात.