मुंबई : गेल्या अकरा महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित ३ हजार ८८३ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यापैकी अवघ्या ७०७ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. आतापर्यंत ९३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यानेही आरोपीपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होताना दिसत आहे. यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणुकीतून शिकार होताच, तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते. तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे परत मिळू शकतात. सायबर सेलच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यांत काम चालते. सध्या फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते.
तक्रारदाराने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते.
ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तात्काळ फ्रीज्ड करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात.
बँकेच सहकार्य महत्त्वाचे :
नागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवर्समुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते, तसेच अशा गुन्ह्यांच्या तपासादरम्यान बँक सहकार्यही महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी पोलिसांना अनेक पाठपुरावा करावा लागतो.
...तर वाचतिल पैसे
अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली लिमिट, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यास आल्यास तात्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.
मनुष्यबळाचा अभाव :
सायबर पोलिस ठाण्यासह सायबर विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे.