‘खाकी’वरचे डाग जाणार तरी कसे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:43 PM2022-03-20T12:43:44+5:302022-03-20T12:44:17+5:30

नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. ते अशी दलाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

How to get rid of stains on police uniform | ‘खाकी’वरचे डाग जाणार तरी कसे ?

‘खाकी’वरचे डाग जाणार तरी कसे ?

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे

अँटिलिया स्फोटके प्रकरणानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याच्यासह त्याच्या पथकावर अटकेची झालेली कारवाई आणि याला जबाबदार ठरवत तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर करण्यात आलेली कारवाई, पुढे दाखल झालेले गुन्हे यामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन झाली. यातून मुंबई पोलीस दल सावरत नाही तोच अंगडीयांकडून पैसे वसुलीचे प्रकरण उघडकीस आले आणि मुंबई पोलीस दलाला आणखी एक डाग लागला.

नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. ते अशी दलाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, कमी वयात चांगली कामगिरी बजावून सतत माध्यमांच्या प्रसिद्धीझोतात असलेले आयपीएस अधिकारी डॉ. सौरभ त्रिपाठी यांचे नाव खंडणीच्या गुन्ह्यात आले आहे. यातून ते सहीसलामत सुटतीलही; पण पैसे वसुलीच्या झालेल्या आरोपांमुळे पोलिसांची सतत डागाळत चाललेली प्रतिमा कशी सावरणार, हा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.

काळबादेवी, मुंबादेवी परिसरात सुमारे १००च्या आसपास अंगडिया व्यावसायिक कंपन्या आहेत. त्यांच्यामार्फत भारतातील महत्त्वाच्या शहरांत पार्सल पाठविले जातात. दररोज कोट्यवधीमध्ये सुरू असलेल्या या उलाढालीदरम्यान कुठलीही बाधा येऊ नये म्हणून अशा ठिकाणी नियुक्ती होणाऱ्या अधिकाऱ्यांचे खिसेही लाखोंमध्ये भरले जातात. सर्व सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या इच्छा पूर्ण करणे अंगडियांना भाग आहे.

परंपरेपेक्षा वेगळा पायंडा पाडत अधिकाऱ्याने मोठा घास घेतल्याने अंगडियांमध्ये एकच खळबळ उडाली. अंगडियांनी एकजूट दाखवत मनमानी कारभाराला विरोध केला. अंगडिया असोसिएशनने गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना लेखी अर्ज देत पोलीस उपायुक्त डॉ. त्रिपाठी यांच्यासह एलटी मार्ग पोलिसांच्या त्रासातून सुटका करण्याची विनंती केली. डॉ. त्रिपाठीने अंगडियांकडे दर महिना दहा लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. अंगडियांनी नकार कळविल्याने डॉ. त्रिपाठीने कारवाई करण्याचा इशारा दिला. तेवढ्यावर न थांबता कारवाई सुरूही केली. डॉ. त्रिपाठी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर अप्पर पोलीस आयुक्ताकडे धाव घेतल्याचे अंगडियांनी नमूद केले.

डॉ. त्रिपाठी हे २०१० बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यपाल के. शंकरनारायण यांचे सहायक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी उल्लेखनीय काम करत चांगली प्रतिमा निर्माण केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही त्यांनी प्रभाव टाकला होता. अण्णा यांनी त्या काळात केलेल्या आंदोलनात त्रिपाठी यांनी चोख बंदोबस्त ठेवत अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांची बदली मुंबईत झाली. मुंबईत परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून आणि नंतर सुरक्षा विभागाचे उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. उपायुक्त डॉ. त्रिपाठी यांच्याशिवाय अन्य कोणी उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचारी यांचाही या वसुलीत हात होता का, याचीही चौकशी सुरू झाली आहे. होळीच्या सणामध्ये धुळवडीचे रंग उडवून सर्वांनी हा सण आनंदाने साजरा केला. यावेळी अंगावर व कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग हे सहज धुऊनही निघालेत; पण पोलिसांच्या खाकीवर मात्र पैसे वसुलींच्या प्रकरणांचे लागणारे डाग कसे मिटणार?

डॉ. त्रिपाठींची नियुक्ती परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी धडक कारवाई सुरू केली. अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल केल्यामुळे ते सतत चर्चेत होते. 
माध्यमांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या स्टोरी झळकत असतानाच, अंगडियांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन आयकर विभागाच्या कारवाईची धमकी देत पैसे वसुलीचे प्रकरण समोर आले. 
तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर हेच अंगडिया वसुली प्रकरण पुढे त्रिपाठींच्या अंगलट आले. सध्या पोलीस यंत्रणाच त्रिपाठींचा शोध घेत आहे.

Web Title: How to get rid of stains on police uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.