चाचण्या वाढवणार कशा? हात बांधलेत; रेल्वेस्थानके, सार्वजनिक ठिकाणी चाचण्यांबद्दल पालिका अधिकाऱ्यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:09 PM2022-06-08T12:09:14+5:302022-06-08T12:09:41+5:30
अशा परिस्थितीत आम्ही कोरोना चाचण्या वाढवणार कशा, आमचे हात बांधलेले आहेत, असे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरांत कोरोना हातपाय पसरू लागला असून, दिवसाला ३० हजार चाचण्या करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत; परंतु आता रेल्वे स्टेशन, बस थांबे, विविध सार्वजनिक ठिकाणांवर कोरोना चाचण्या करणे अनिवार्य नाही. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ कोरोनाची लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत आम्ही कोरोना चाचण्या वाढवणार कशा, आमचे हात बांधलेले आहेत, असे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
फेब्रुवारीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांत ७०० हून कमी कोरोनाबाधित आढळत होते कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत म्हणजेच जानेवारी महिन्यात मुंबई दिवसाला ६० हजार चाचण्यांसह आघाडीवर होती.
सध्या पालिका आयुक्तांनी दिवसाला ३० हजार कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश दिलेले आहेत; मात्र आता सार्वजनिक ठिकाणांवर
कोरोना चाचण्या करणे अनिवार्य राहिलेले नाही. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ लक्षणे आढळणाऱ्यांच्याच चाचण्या करण्यासाठी परवानगी आहे. त्यामुळे केवळ कोरोनाची लक्षणे असणारेच रुग्ण येत असून अनेकजण सौम्य लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करतच नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत कोरोना चाचण्या वाढवायच्या कशा असा सवाल पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केला.
क्वारंटाईन होण्याची भीती
झोपडपट्टीवासीयांमध्ये अनेकजण कोरोना चाचणी करण्यास नकार देत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाची लक्षणे आढळली तरीही ते कोरोना चाचणी करून घेत नाहीत. पॉझिटिव्ह आलोच तर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल याची भीती अनेकांमध्ये असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत आकडा वाढलेलाच; ५ हजार ९७४ हजार सक्रिय रुग्ण
मुंबईत मंगळवारी १ हजार २४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७१ हजार ७७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४६ हजार २३३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार ९७४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच असल्याचे समोर आले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९८६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७० टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १ हजार २४२ रुग्णांपैकी ११६८ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ६०० खाटा असून त्यापैकी २५४ खाटांवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहेत.
१०३ वेळा शून्य मृत्यूची नोंद
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आले आहे.