मुंबई : सर्वसामान्यपणे मानवाच्या रक्तातील साखर नियंत्रित राहणे गरजेचे असते. जर साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झाले तर नागरिकांना मधुमेह हा आजार जडू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते. त्यामध्ये साखरेची पातळी नियंत्रणात नसल्यास हृदयविकार, किडनी विकार आणि दृष्टिदोषसारख्या व्याधी होण्याची शक्यता असते. त्याकरिता रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.शरीरातील साखर कमी-जास्त झाल्यास सर्वसाधारपणे चक्कर येणे, सतत अंधुक दिसणे, वारंवार लघवीला होणे, त्याचप्रमाणे तहान मोठ्या प्रमाणात लागणे, अशी लक्षणे आढळून येतात. याकरिता तत्काळ डॉक्टरांना भेटून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास ‘हायपोग्लायसेमिय’देखील म्हणतात.
साखर असामान्य होते तेव्हा... वारंवार लघवीला लागणे : या अशा व्यक्तींना वारंवार लघवीला होते. सर्वसामान्यांपेक्षा हे अनेक वेळा लघवीसाठी ये-जा करत असतात, तसेच त्यांना तहानसुद्धा मोठ्या प्रमाणात लागते. अधिक पाणी पिणे आणि सतत लघवीला जाणे हे एक लक्षण आहे. थकवा जाणवणे : थोडेफार काम केले तरी या व्यक्तींना तत्काळ थकवा जाणवू लागतो. त्याशिवाय या रुग्णांच्या दृष्टीमध्ये दोष निर्माण होऊन त्यांना अंधुक दिसू लागते. चक्कर येणे : या रुग्णाची शरीरातील साखरेची पातळी खाली आली तर त्यांना चक्कर येतें. त्यामुळे त्यांना लगेच तोंडात काही तरी गोड साखरेचे पदार्थ खावे लागतात.
साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी...आहार : या रुग्णांना आहारात मोठ्या प्रमाणत पथ्य पाळावे लागते. त्यांना साखर पूर्णपणे बंद करावी लागते, तसेच डॉक्टरांनी सुचिविल्याप्रमाणे आहार घेणे गरजेचे आहे.व्यसनांना बंदी : जर मद्यपानासारखे एखादे व्यसन असेल तर त्यांनी ते तत्काळ बंद केले पाहिजे.व्यायाम : संतुलित आहाराबरोबर योग्य व्यायामाची गरज असते. विशेष म्हणजे या रुग्णांनी नियमितपणे चालणे गरजेचे असते. योग प्राणायाम केल्यास अधिक फायदेशीर असते.जंक फूड नको : प्रक्रिया केलेले पदार्थ जंक फूड खाऊ नये.मधुमेहाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. अनेकांना मधुमेह आहे ते त्यांना रक्तातील साखर तपासल्यावर लक्षात येते. त्यामुळे प्रत्येकाने किमान वयाच्या चाळिशीनंतर दर तीन वर्षांनी साखर तपासली पाहिजे. मात्र, घरात कुणाला हा आजार असेल तर वयाच्या २५ वर्षांनंतर, तसेच पुरुषाच्या पोटाचा घेर ९० सेंटिमीटर आणि महिलांचा पोटाचा घेर ८० सेंटिमीटर असेल तर त्यांनी दरवर्षी साखर तपासली पाहिजे. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. - डॉ. शशांक जोशी, मधुमेहतज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल