शाडूच्या मातीने उंच मूर्ती कशा बनविणार? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 13:44 IST2024-12-21T13:43:57+5:302024-12-21T13:44:53+5:30
गणेशमूर्तीसाठी पीओपीचा वापर करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता.

शाडूच्या मातीने उंच मूर्ती कशा बनविणार? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशमूर्ती घडविण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसला (पीओपी) पर्याय म्हणून शाडूची माती पुरवण्याची तयारी मुंबई महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, गणेशोत्सव मंडळांच्या उंच मूर्तीमुळे त्या घडविण्यावर येणारी मर्यादा, मूर्तीची सुरक्षितता तसेच हजारोंच्या संख्येने असलेल्या घरगुती गणपतींमुळे तितक्या प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होईल का, असे प्रश्न मंडळांनी उपस्थित केले आहेत.
गणेशमूर्तीसाठी पीओपीचा वापर करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. या निर्णयाची पुढील गणेशोत्सवात अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक गुरुवारी झाली.
२०२५ मध्ये देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यावर भर द्यावा. गतवर्षीप्रमाणे यंदाही शाडू माती आणि जागा देण्यात येईल, असे उपायुक्त प्रशांत सकपाळे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी मूर्तिकारांच्या सूचनाही जाणून घेतल्या.
अन्य पर्याय कोणता?
'पीओपी'चा वापर करू नका, असे गुरुवारी बैठकीत सांगण्यात आले. पण 'पीओपी'ला अन्य पर्याय कोणता हे अजून समोर आले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी आम्हाला पर्याय सांगितला पाहिजे. त्यानंतर मार्ग निघू शकतो, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले.
समितीचे काय झाले?
शाडूची मूर्ती तयार करण्याबाबत मागील वर्षी आयआयटी आणि निरी संस्थेच्या प्रतिनिधींची समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीने अजून अहवाल दिलेलाच नाही, याकडेही दहिबावकर यांनी लक्ष वेधले.
उंच मूर्ती घडविणे अशक्य?
गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती उंच असतात. शाडूच्या मातीपासून या मूर्ती घडविणे शक्य नाही. मग उंच मूर्ती बनवायच्या कशा, असा पेच मंडळांपुढे आहे. पीओपीच्या मूर्तीच्या तुलनेत शाडूची मूर्ती दुप्पट दराने मिळते. १२ फुटांपेक्ष जास्त उंचीची मूर्ती असेल, तर मंडपातील प्रकाशझोताने तर्डे जाण्याची शक्यता असते. लाखो टन माती पालिका कुठून देणार, शाहूची मूर्ती बनवायला वेळ लागतो. त्यामुळे सहा महिने आधीच मंडप उभारावा लागेल, त्यास पालिका परवानगी देणार का, असा सवाल बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केला.