Join us

पडीक गिरण्यांत फवारणी करायची तरी कशी? कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची अडचण

By रतींद्र नाईक | Published: August 03, 2023 10:05 AM

गिरण्याच नव्हे तर मुंबईतील काही इमारती पडक्या स्थितीत असून, या बंद गिरण्यांच्या इमारतींंमध्ये डेंग्यू, मलेरिया पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होते.

मुंबई :  

गिरण्याच नव्हे तर मुंबईतील काही इमारती पडक्या स्थितीत असून, या बंद गिरण्यांच्या इमारतींंमध्ये डेंग्यू, मलेरिया पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून या डासांच्या अळ्या वेळच्या वेळी नष्ट केल्या जात असल्या तरी अवघड जागी ड्रोननेही फवारणी करता येत नाही अशावेळी कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून  फवारणी करावी लागते. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

मुंबईत आजही अनेक बंद गिरण्या तुटलेल्या आणि धोकादायक स्थितीत असून, इमारती असो किंवा मोकळी मैदाने असो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डास अळ्या घालत असून, त्या जागा धोकादायक ठरत आहेत. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण डासांमुळे वाढत असल्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून इमारती, गॅरेज, मोकळ्या जागा यांची झाडाझडती घेतली जाते व या अळ्या नष्ट केल्या जातात. 

मात्र मुंबईतील सीताराम, शक्ती, सेंच्युरी अशा मिल पडक्या अवस्थेत असून, या ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने या मिलमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन विकत घेतले असून, ड्रोनमार्फत फवारणी केली जाते. मात्र, काही ठिकाणी ड्रोन पोहोचू शकत नाही. त्यामुळे कीटकनाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच जीव धोक्यात घालून फवारणी करण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा कीटकनाशक विभागाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून अडगळीच्या ठिकाणी असलेल्या डासांची उत्पत्ती स्थाने शोधतात व नष्ट करतात. अशा धाडसी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जाते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

अपघात असा घडू शकतोमुंबईतील मिल असो किंवा बीपीटीच्या इमारती, अथवा कोर्ट कचेरीत अडकलेल्या इमारती असो. या इमारती वर्षानुवर्षे धोकादायक स्थितीत उभ्या असून, त्या केव्हाही पडू शकतात. अशा इमारतींमध्ये डासांची पैदास होते. डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक  इमारतीत जावे लागते. पावसाचे दिवस असल्याने या इमारतींचा स्लॅब, भिंत किंवा मजला केव्हाही कोसळू शकतो.फवारणी राहून जाते

धोकादायक इमारती किंवा अडगळीच्या ठिकाणी अनेकदा ड्रोनदेखील पोहोचत नाही. त्यामुळे फवारणी करता येत नाही तेथे आम्हालाच जावे लागते. मात्र, काही जागा या इतक्या दयनीय असतात की पाय ठेवला तरी तो भाग कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्हीदेखील जाण्याचे कधी कधी टाळतो व फवारणी राहून जाते, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

१ जानेवारी ते १५ जुलैपर्यंतची माहितीऍनाफिलीस डासांची स्थाने ४,५६७एडिस डासांची स्थाने ४१,९७८डासांची उत्पत्ती स्थाने  १,९९,०५९ 

नष्ट केलेले स्रोत (टायर): ७,२५५नष्ट केलेल्या करवंट्या, भंगार साहित्य: २,२६,१२१

टॅग्स :मुंबई