Join us  

रुग्णांशी कसे बोलायचे, आर्थिक नियोज कसे करायचे ? निवासी डॉक्टरांच्या परिषदेत चर्चा होणार

By संतोष आंधळे | Published: June 13, 2024 10:58 PM

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना ( मार्ड ) यांनी या ,परिषदेचे आयोजन जे जे रुग्णालयाच्या परिसरात केले असून १५ ते १७ जुन या कालावधीत ही परिषद होणार आहे.

मुंबई : आज पर्यंत डॉक्टरांच्या अनेक वैद्यकीय परिषदा आयोजित केल्या जात असून ही मार्डकॉन नावाने ओळखली जाणारी ही परिषद वेगळी आहे.  निवासी डॉक्टरांच्या हितासाठी निवासी डॉक्टर संघटनेने  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने  परिषद आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या परिषदेत निवासी डॉक्टरांनी रुग्णांशी कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे या विषयापासून ते डॉक्टरांनी आर्थिक नियोजन कसे करावे ? या आणि अशा विविध वैद्यकीय विषयावर तज्ज्ञांकडून धडे मिळणार आहे.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना ( मार्ड ) यांनी या ,परिषदेचे आयोजन जे जे रुग्णालयाच्या परिसरात केले असून १५ ते १७ जुन या कालावधीत ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ  बी एन गंगाधर यांच्या सोबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर उपस्थित राहणार आहेत.

कोणत्या विषयावर चर्चा होणार

अनेक वेळा केवळ डॉक्टर आणि रुग्णाचा संवाद व्यवस्थित नसल्यामुळे वाद झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर संवाद कसा असावा या विषयवार तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञान असते मात्र आर्थिक नियोजन करावे यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्या विषयावर सुद्धा संवाद साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे गुड क्लिनिकल प्रॅक्टिस आणि गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस या वैद्यकीय विषयवार चर्चा घडवून आणण्यासाठी राज्यातील विविध भागातून तज्ज्ञ हजेरी लावणार आहेत. निवासी डॉक्टरांना ज्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्याबात सुद्धा या परिषदेत चर्चा घडवून आणली जाणार आहे. त्यामध्ये डॉक्टरांवरील हल्ले, हॉस्टेलचे प्रश्न, पी जी गाईडची चणचण या विषयावर सुद्धा निवास डॉक्टर विविध व्याख्यानाच्या माध्यमातून परिषदेत मुद्दे मांडणार आहेत.        

राज्यात पहिल्यांदाच निवासी डॉक्टरांची वैद्यकीय परिषद आयोजित केली जात आहे. तीन दिवसाच्या या परिषदेत विविध शाखांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून १००० पेक्षा अधिक निवासी डॉक्टर उपस्थित लावणार आहेत. राज्यात ८ ते ९ हजार निवासी डॉक्टर आहेत. मात्र सर्वाना या परिषदेत सहभागी करून घेतले जाऊ शकत नाही. कारण रुग्णालयाचे नियमित काम सुद्धा सुरु असते. विशेष करून तिसऱ्या वर्षातील डॉक्टरांनी या परिषदेला हजर राहावे असे अपेक्षित आहे. निवासी डॉक्टरांचा या परिषदेला मोठ्या संख्यने नोंदणी केली असून जागेअभावी आम्ही नोंदणी थांबविली आहे. निवासी डॉक्टरांच्या सर्व विषयांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे.    

डॉ अभिजित हेलगेअध्यक्ष, मार्ड