लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात तृतीयपंथींच्या उपचारांसाठी प्रथमच स्वतंत्र वॉर्ड नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर तृतीयपंथींबाबत जनजागृती करण्याबाबत डॉक्टर, नर्सेस, चतुर्थश्रेणी कामगार यांच्यासाठी जी. टी. रुग्णालयात नुकतेच विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या विषयातील तज्ज्ञांना बोलावून कशा पद्धतीने या लोकांना रुग्णसेवा द्यावी, यावर चर्चा करण्यात आली. जी. टी. रुग्णलयातील दुसऱ्या मजल्यावर वॉर्ड क्रमांक १३ मध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे.
‘तृतीयपंथींसाठी राज्यात प्रथमच स्वतंत्र वॉर्ड’ या आशयाचे वृत्त प्रथम ‘लोकमत’मध्ये ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. अनेकवेळा सार्वजनिक रुग्णालयात तृतीयपंथी ज्यावेळी उपचारासाठी जातात. त्यावेळी त्यांच्याकडे इतर रुग्णांप्रमाणे बघणे अपेक्षित असताना त्यांना हीन दर्जाची वागणूक मिळत असते. त्यामुळे आता हा स्वत्रंत वॉर्ड त्यांच्या आरोग्यासाठी असल्याने त्यांना जाचाला यापुढे बळी पडावे लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी जी. टी. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थश्रेणी कामगार यांच्यासाठी यासंदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी हमसफर ट्रस्टच्या माजी संचालिका आणि मानसशास्त्रज्ञ हेमांगी म्हाप्रळकर यांना बोलाविण्यात आले होते. गेल्या २२ वर्षांपासून त्या क्षेत्रात काम करत आहेत. तृतीयपंथींना कशी रुग्णसेवा द्यावी, या विषयावर परिसंवादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
सध्या आमच्याकडे तृतीयपंथींचा वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि त्यांच्याबाबत जनजागृती यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तृतीयपंथींना इतर रुग्णांप्रमाणेच वागणूक मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या वॉर्डसाठी तृतीयपंथींसाठी असलेल्या राष्ट्रीय परिषदेतील झैनाब पटेल यांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच विशेष नियमावली बनविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सगळ्या विभागाच्या प्रमुखांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.- डॉ. सारिका दक्षिकर, उपअधीक्षक, जी. टी. रुग्णालय.