Join us

विश्वासघाती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, इमारत दुर्घटनेनंतर राणेंचा पुन्हा 'प्रहार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 2:07 PM

महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

मुंबई - महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना  मदत जाहीर केली आहे. 

महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतर चार वर्षांच्या मोहम्मद बांगीला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. मात्र, अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. या घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीक केलीय. 

राणे यांनी सरकारवर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, निसर्ग वादळच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडवासीयांना अद्यापही पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही. आता, महाड इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे. पण, या विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ?, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न उपस्थित केला आहे.  

दरम्यान, पुणे तळेगाव दाभाडे येथून महाडकडे येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात येऊन कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि रायगड पोलीस यांनी विशेष सतर्कता बाळगली होती. यामुळे रात्री एक वाजून दहा मिनिटांनी NDRF चे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहोचून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली. महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमित शहांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे. NDRF च्या टीम घटनास्थळी थोड्याच वेळात पोहचून लवकरच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होईल, सर्वाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असं ते म्हणाले आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर; - मंत्री विजय वडेट्टीवार 

आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 9 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश; त्यापैकी 2 व्यक्तींचा मृत्यू; तर सात व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

जखमी व्यक्तींचा तपशील:-1)नमिरा शौकत अलसूरकर, वय 19 वर्षे, 2)संतोष सहानी, वय 24 वर्ष,  3)फरीदा रियाज पोरे4)जयप्रकाश कुमार, वय 24 वर्ष, 5)दिपक कुमार, वय 21 वर्षे, 6)स्वप्निल प्रमोद शिर्के, वय 23 वर्ष, 7)नवीद हमीद दुष्टे, वय 32 वर्षे.

मृत व्यक्तींचा तपशील :- 1)सय्यद अमित समीर,वय 45 वर्ष.2) नविद झमाले, वय 35 वर्ष

अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर 18 व्यक्तींचा कसून शोध सुरू.

टॅग्स :इमारत दुर्घटनानीतेश राणे महाडमृत्यूसरकार