कशी आहे उद्धव ठाकरेंची प्रकृती, कधीपर्यंत मिळेल डिस्चार्ज, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:16 PM2021-11-22T20:16:58+5:302021-11-22T20:17:40+5:30
Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयानेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती या महिन्याच्या सुरुवातीला अचानक बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मणक्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयानेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भातील ट्विट केले आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच सध्या त्यांच्यावर फिजिओथेरेपी सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has undergone successful spine surgery and is currently recuperating with physiotherapy at H.N. Reliance Hospital in Mumbai. He will be discharged in due course of time.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 22, 2021
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत त्यांनी पूर्णपणे बरे झाल्यावरच काम सुरू करावं, कोणताही धोका पत्करू नये, असा सल्ला दिला होता. "मुख्यमंत्री अजूनही रुग्णायात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. कालच त्यांच्यासोबत फोनवरून माझी चर्चा झाली. लवकरच ते घरी जातील," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. "उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी संपूर्ण बरं होऊन कामाला लागावं. कोणत्याही प्रकारचा धोका त्यांनी पत्करू नये. कारण त्यांच्यावर ज्याप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तो एक नाजूक विषय आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात," असंही ते म्हणाले. "या राज्याचे ते नेतृत्व करत आहेत आणि लवकरच ते बरे होतील हा आम्हाला विश्वास आहे," असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.