Join us

गंजलेल्या तोफांमधून हल्ले कसे होणार?; संजय राऊत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:40 PM

राजभवन ५० एकर जागेत आहे. तेथे जाण्यात आनंद असतो.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राजभवनात मोकळी हवा आहे. तेथे एक भूयारही सापडले आहे. त्या भूयारात गंजलेल्या तोफा आहेत म्हणे. आता कोणी त्या गंजलेल्या तोफांमधून हल्ले करणार असतील, तर त्यातून काहीच साध्य होणार नाही, अशी टीका शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

सध्या राजभवनावर राजकीय नेत्यांची उठबस वाढली आहे. यावर खा. राऊत म्हणाले, राजभवनात जाऊन तक्रारी करण्यात काहींना सुख आणि आनंद मिळतो. तो हिरावून घेऊ नये, या मताचा मी आहे. हे सगळे वेळ घालवणारे खेळ असतात. राजभवन ५० एकर जागेत आहे. तेथे जाण्यात आनंद असतो. तिथे गेल्यानंतर आपण कोरोनाच्या संकटाने वेढले गेलो आहोत, असे वाटत नाही. तेथे मोर नाचत असतात.

उत्तम पाहुणचार होतो. त्यामुळे ज्यांना बोलावले जात नाही तेदेखील वेळ मागून तेथे जातात. विरोधी पक्ष तर तेथे सतत जात असतो हे आपल्या लक्षात आले आहे. तिथे गेले की आपले दु:ख विसरता येते, म्हणून कदाचित ते तेथे जात असतील. सत्ता गेल्याचे सूतक अजून संपलेले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीचे काय? यावर राऊत म्हणाले, शरद पवार दरवेळी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतात. कालही आढावा घ्यायचा होता. मुख्यमंत्री स्वत: पवारांकडे जायला तयार होते. मात्र स्वत: पवारच मातोश्रीवर गेले. लॉकडाऊनसंबंधी आढावा घेतला. ३१ मे नंतर परिस्थितीत काय बदल करायचे यावर चर्चा झाली. हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. जे कोणी धोका करतील ते खड्ड्यात जातील, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी