Join us

मुंबईकरांची तहान भागणार कशी ? पाच वर्षांत नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाची सुरुवात नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 9:42 AM

माहिती अधिकारातून उघड.

सीमा महांगडे, मुंबई :मुंबईतील वाढती लोकसंख्या तसेच उन्हाच्या वाढत्या झळांमुळे होणारे बाष्पीभवन, पाणी गळती, चोरी यामुळे या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. मात्र, दुसरीकडे १ जानेवारी २०१८ ते ३० एप्रिल २०२३ या पाच वर्षांत पालिका प्रशासनाने एकाही नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाची सुरुवात केलेली नाही. वॉच डॉग फाउंडेशनने पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून मागविलेल्या माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब उघड झाली आहे. समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करण्याचा नी:क्षारीकरण प्रकल्प, गारगाई-पिंजाळ प्रकल्प यांचे अनेक वर्षांपासून फक्त नियोजनच सुरू आहे. परिणामी, मुंबईकरांना वारंवार पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईत सध्या गगनचुंबी इमारती, दाटीवाटीने झोपड्याही उभ्या राहत आहेत. याशिवाय विविध विकासकामे ही मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पाण्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडत आहे. 

प्रकल्पांची सद्य:स्थिती काय? 

वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुंबई पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राधान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले होते. 

मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. आता पुन्हा या प्रकल्पासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. गारगाई प्रकल्पाचा आयआयटी मुंबई अभ्यास करणार असून, संस्थेला ३० लाख रुपये पालिका मोजणार आहे. दरम्यान, प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प -

समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी पालिकेकडून डिसेंबर ते जानेवारीदरम्यान निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र मुंबईसाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक असा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक इच्छुकांनी अर्जासाठी कमी कालावधी मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे पालिकेने आणखी एका महिन्याचा वेळ देऊन ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर पालिकेकडून या निविदेला २९ जानेवारी, १७ फेब्रुवारी, ४ मार्च, अशी मुदतवाढ मिळाली होती. आता पुन्हा पालिकेने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

नि:क्षारीकरण प्रकल्पच अव्यवहार्य -

मुंबईसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आंतरराष्ट्रीय शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प अव्यवहार्य असून तो ताबडतोब रद्द करावा व गारगाई पिंजाळ धरण प्रकल्पाला गती द्यावी, असा परखड निष्कर्ष मुंबई विकास समितीने अहवालात काढला आहे.

पाच हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज -

मुंबईला सध्या किमान पाच हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज आहे; मात्र प्रत्यक्षात प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने सध्या आणखी किमान एक हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.

जलस्रोत करणे आवश्यक -

वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित गारगाई, पिंजाळ व दमणगंगा यांसारखे नवीन जलस्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेचे हे नियोजित प्रकल्प पालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. 

मुंबईकरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालिका काहीच हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय निक्षारीकरण प्रकल्प आणि गारगाई प्रकल्पाचे पालिका नेमके काय करणार? याची माहिती पालिकेने द्यावी.- गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन 

पालिका पाणी धोरणासाठी नेमके काय प्रकल्प राबवीत आहे? त्यांची स्थिती काय? कुठे आणि कसे आणि कशा पद्धतीने ते कार्यान्वित होतील, या सगळ्याची माहिती पालिका प्रशासनाने मुंबईकरांसाठी समोर ठेवायला हवी. कोणत्याही प्रकल्पाची व्यवहार्यता आणि उपयोगिता ही महत्त्वाची आहे - नंदकुमार साळवी, माजी अभियंता, मुंबई पालिका

टॅग्स :मुंबईपाणी टंचाईपाणीकपात