तरुण लेखक कसे घडणार?

By admin | Published: January 31, 2017 03:14 AM2017-01-31T03:14:22+5:302017-01-31T03:14:22+5:30

आजचा तरुण लिहितो काय, तो व्यक्त होतो कसा? त्याचे व्यक्त होण्याचे माध्यम असो की, हाताळले जाणारे विषय असोत, त्याबद्दल प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. तो सतत लिहिता आहे.

How will the young writer be? | तरुण लेखक कसे घडणार?

तरुण लेखक कसे घडणार?

Next

आजचा तरुण लिहितो काय, तो व्यक्त होतो कसा? त्याचे व्यक्त होण्याचे माध्यम असो की, हाताळले जाणारे विषय असोत, त्याबद्दल प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. तो सतत लिहिता आहे. प्रत्येक घटनेबाबत प्रतिक्रियावादी आहे. मग, तो सतत जे व्यक्त करतो, ते इन्स्टंट साहित्य आहे का? त्यातून काही कसदार तयार होते आहे का? अशा अनेक प्रश्नांवर मनमोकळी भूमिका मांडली सतत तरुणांच्या सान्निध्यात असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी...

- युवकांच्या साहित्यात खरोखरीच बदल होतोय का?
- प्रत्येक पिढीची साहित्य व्यक्त करण्याची पद्धत बदलत जाते. जेव्हा समाजातच शांती, भरपूर वेळ आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची नाती होती, तेव्हाचे खांडेकरी वळणाचे लेखन आताचे युवक करणे शक्य नाही. सध्याच्या युवकांचे साहित्य हे एखाद्या ‘फास्ट फूड’प्रमाणे होते आहे. कारण, जमाना ‘इन्स्टंट’चा आहे. ‘सब कुछ दो मिनिटोंमे’ यात सुख, दु:ख, नाती आणि कलात्मक अभिव्यक्ती, ही पण दोन मिनिटांवर आली आहे. म्हणूनच, युवकांच्या साहित्यात एक प्रकारची त्रोटकता आली आहे. पण, त्यामुळेच खोलवर जाऊन एखाद्या गोष्टीचे चिंतन करण्यास त्यांना वेळ नाही. म्हणूनच, वाचून पूर्ण झाल्यावर मनात रेंगाळणारे साहित्य ते निर्माण करू शकत नाहीत. सारे काही वाचतावाचता संपून जाते. असे नश्वर लेखन आज वारेमाप वाढलेले दिसते. अपवाद असतील; पण अपवादापुरतेच.
- कोणत्या विषयांवर तरुण सर्वाधिक व्यक्त होताना दिसतात?
- एकांकिका आणि कविता ही दोन माध्यमे त्यांच्याकडून अधिक हाताळली जातात. त्यांच्याकडून लिहिले जाणारे प्रामुख्याने विषय त्यात- आजचे बदललेले स्त्रीपुरुष संबंध, नात्यांमधून जाणवणारी विफलता, सुखवस्तू एकाकीपणा असे विषय प्रामुख्याने हाताळले जातात. त्यामध्ये ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ आणि त्याला आलेले ‘प्रॅ्रक्टिकल’ तंत्रबद्ध असे कोरडे रूप युवक अधिक वापरतात. कारण, आजचे त्यांचे ते आयुष्य आहे. त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या फ्रस्ट्रेशन आलेला तरुण मला दिसतो. त्यांच्या कवितेत व एकांकिकांमध्ये ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ हे सैरभैरपण मला जाणवतंय, असे आजचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात प्राबल्याने आढळते.
- सोशल मीडियामुळे (फेसबुक, ब्लॉग) तरुणांना व्यक्त होण्याचं सोपं साधन मिळालंय किंवा एक सहजसोपे व्यासपीठ मिळालंय, असं वाटतं का?
- खरेतर, हा व्यासपीठाचा आभास आहे. धावपळीच्या गर्दीत, धावत्या ट्रेनमधून फक्त हाय करावे आणि त्याला संवाद समजावे, असे हे ‘बुडबुडा’ माध्यम आहे. याचे कारण युवक बोटांच्या लेखणीने संगणकावर टाइप करतात. ते लेखन तपासण्यासाठी, होकार-नकार पचवण्यासाठी युवकांना मार्गदर्शक संपादकच नाहीत. खरेतर, त्यांची आशा-निराशा, त्यांचे प्रेम, विरह हे सर्व उत्कटतेच्या प्राणबिंदूपर्यंत येण्याआधीच ते काचेच्या कागदावर छापले जाते आणि त्याची कलाकृती होण्याआधीच ते हवेत विरले जाते. ज्या सुखदु:खाच्या पूर्वी कथा-कादंबऱ्या झाल्या, सर्वोत्तम नाटके झाली. आज त्याचे फक्त ‘चॅट’ होते. सोशल मीडिया हे युवकांच्या सृजनशक्तीचा अकाली गर्भपात घडवणारे माध्यम आहे. ज्यातून महावृक्ष निर्माण होतील, त्यातून फक्त गवताची पैदास होत आहे. कारण, सोशल मीडिया फक्त तात्पुरते स्वीकारते. चिरंतनाला येथे जागा नाही. म्हणून, माझ्यासारख्या ज्येष्ठ पिढीतील लेखकाला असे वाटते, यातून आजच्या युवकांतील जी.ए. कुलकर्णी, कुसुमाग्रज, आरती प्रभू, इंदिरा संत हे निर्माण होणार कसे? कारण, या होण्याच्या सर्व शक्यता सोशल मीडियाचा डायनॉसोर एका क्षणात गिळून संपवतो.
- तरुणांचे वाचन कमी झालंय, असं सर्रास म्हटलं जातं. त्याचा परिणाम त्यांच्या साहित्यावर-अभिव्यक्तीवर होतो का?
- रूढ अर्थाने आपण ज्याला वाचन म्हणतो, त्या प्रकारचे वाचन केले नाही तरी चालेल, असेच पर्यावरण भोवती आहे. पंगतीमध्ये बसून जेवायला वेळ नसल्याने उभ्याउभ्या वडापाव खाऊन पुढे जावे, असेच सांस्कृतिक पर्यावरण दुर्दैवाने आजच्या युवकांना मिळाले आहे. म्हणूनच, ‘बुकफेस’पेक्षा ‘फेसबुक’ त्यांना जवळचे वाटते. बरे, या माध्यमातून तरी अभिजात कलाकृती ते वाचतात का? चरित्रे, आत्मचरित्रे, पूर्वीचे अग्रलेख या सगळ्यांचे वाचन न करता अतिअति सामान्य चारोळ्या, प्रेमाच्या पातळ कविता आणि अगदी भंपकपणे लिहिले गेलेले खोटेखोटे आध्यात्मिक लेखन हे युवकांना आवडते. कारण, ते म्हणे त्यांना ‘पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड’ देते. त्यामुळे सखोल वाचन नाही. सखोल चिंतनाला वेळ नाही. ‘झट मँगनी पट ब्याह’प्रमाणे आजच्या युवकाचे आयुष्य आहे. अर्थात, त्याला तो जबाबदार नाही; पण परिणाम मात्र भोगतो आहे. आजच्या युवकाचे घडण्याचे आयुष्य पोटार्थी स्पर्धात्मक परीक्षा देण्यातच संपून जाते. नंतर, ‘स्ट्रगल’ व्यवसायाचा. येथेही जीवघेणी स्पर्धा, अपेक्षाभंग विश्वासघात या पर्यावरणात तो जे वाचेल, त्यात विस्तार आणि खोली कशी असणार? म्हणूनच, खुजे वाचन! थिटी निर्मिती!
- मराठी भाषेपेक्षा अन्य भाषांत खासकरून इंग्रजीत व्यक्त होणं तरुणांना अधिक भावतं का किंवा तुलनेने ते अधिक सोपे पडते, असे वाटते का?
- येथे सोपे आणि कठीण हा प्रश्नच नाही. व्यक्त करण्यासाठी आजच्या तरुणांकडे एकाही भाषेचे सशक्त माध्यमच नाही. भाषेच्या दृष्टीने आजची युवक पिढी त्रिभंगलेली आहे. त्यांच्याकडे ना सशक्त इंग्रजी, प्रभावी हिंदी आणि समर्थ मराठी. मग, हे बिचारे तरुण तिन्ही भाषांचे कुरूप कोलाज करून अर्धवट टवके उडालेले काहीतरी लिहितात आणि मग आम्ही समजून घ्यायचे, ‘हीच काय ती आजच्या तरुणाईची भाषा बरं.’ खरेतर, मर्ढेकरांनीही इंग्रजीमिश्रित मराठी अभिव्यक्तीसाठी मांडली. त्यात त्यांची भाषेची असमर्थता नव्हती, पण गरज होती. उदाहरणार्थ- ‘हाडबंडले’ तशा बायका किंवा रात्र दिव्यांनी पंक्चरलेली. यातून मर्ढेकरांना यंत्रवत झालेले आयुष्य मांडायचे होते. पण, तेच मर्ढेकर थोर समीक्षक होते. आज कुठलीही एक भाषा समर्थ नसलेले युवक ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, त्यातून मराठी साहित्याचे भविष्य नेमके किती मराठीतून? हाच प्रश्न मला पडला आहे. म्हणून, आजचा युवक इंग्रजीकडे वळतो. ते नाइलाजाने बालपणापासून इंग्रजीचे पर्यावरण त्याच्या मेंदूभोवती, संवेदनांभोवती पेरलेले आहे. तो कुठल्याही भाषेचा प्रतिनिधी ठरत नाही.
- शहरातला व्यक्त होणारा तरुण आणि ग्रामीण भागातील व्यक्त होणारा तरुण यांच्या लिखाणात काही मूलभूत फरक जाणवतो का?
- आता ग्रामीण आणि शहरी यांच्या मधला एक अर्ध शहरी, अर्ध ग्रामीण असा युवक निर्माण झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातून आलेला तरुण कवितेकडे अधिक वळला आहे आणि त्याचे विषय शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी निगडित आहेत. दुष्काळग्रस्त शेतकरी, त्यांच्या आत्महत्या, भारनियमनातून निर्माण होणाऱ्या समस्या, असे शहरात न जाणवणारे अनेक प्रश्न आजचे ग्रामीण तरुण निर्भीडपणे मांडताना दिसतात. विशेषत: बोलीभाषेतील रांगडेपणा आणि खास मराठी मातीचा सुगंध त्यांच्या लेखनाला येतो. परंतु, खेड्यातून शहरात येईपर्यंत पुरेशा मार्गदर्शनाअभावी तो मध्येच गोठून जातो. कुठेतरी स्थानिक पातळीवरच्या पतपेढीत वा ज्युनिअर कॉलेजमध्ये चिकटून त्याची प्रतिभा गोठून जाते. त्याला मुख्य प्रवाहात येणे जमत नाही. म्हणूून, आज या सशक्त उष्णधारा मुख्य प्रवाहात घेणे, ही ज्येष्ठ साहित्यिकांची व संमेलनाची गरज आहे, असे मला प्राणपणाने वाटते.

मुलाखतकार : प्रज्ञा म्हात्रे

Web Title: How will the young writer be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.