मुंबई: सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली आहे. राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही किस्सेही घडल्याची माहिती समोर आली आहे.
'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, राज ठाकरे राजभवनात दाखल होताच १ वर्षापासून मी तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्राच्या 'राज'चे आज दर्शन झाले, असं राज्यपाल म्हणाले. यानंतर राज ठाकरे यांनी राज्यपालांना मागणी संदर्भात निवेदन देऊन लोकांना दिलासा देण्याची विनंती केली. या भेटीदरम्यान नेमका काय संवाद झाला ते पाहा.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी : 1 साल से मै आपकी राह देख रहा हूँ.. महाराष्ट्र के राज के आज दर्शन हुए. त्यानंतर राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ आणि निवेदन दिले.
राज ठाकरे : वाढीव विजबिलांमुळे लोकांचे हाल होत आहेत, ज्यांना 5 हजार बिलं यायची त्यांना 25 हजार बिलं येतायत. लॉकडाऊनमुळे नोकरी-धंदे बंद असल्यानं लोकांनी पैसै आणायचे कुठून.
अनेक दिवसांपासून आम्ही संबंधीत विभागाची मंत्री, अधिकाऱ्यांशी बोललो, बैठका घेतल्या, आंदोलन केली पण तरी ही सरकारने कोणता ही निर्णय घेतला नाही. मला अशी माहिती मिळाली आहे की सरकारच्या बैठका होऊन सगळं ठरलं आहे. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादीच्या श्रेयवादामुळे लोकांना दिलासा मिळत नाही. त्याचप्रमाणे हे खातं काँग्रेसकडे असल्यानं त्यामुळे तिन्ही पक्षांमधे समन्वय नाही आणि म्हणून लोकांना दिलाशाचा निर्णय होत नाही. त्यामुळे आपण राज्यपाल म्हणून दखल घेत योग्य ती कारवाई केली तर बरं होईल.
राज्यपाल : या सरकारमधे शरद पवारांचं ऐकलं जातं त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवीन पण त्यावर सरकार काही करणार का? याबद्दल मला शंका आहे, म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलीन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन.
राज ठाकरे : मी पवारांशी निश्चित बोलेन. मात्र, आपण राज्याचे प्रमुख म्हणून जनतेच्या हिताचं पाऊल उचालाल अशी अपेक्षा आहे.
मनसे सरचिटणीस बाळा नांदगावकर : नितिन राऊत म्हणतात जर केंद्रानं 10 हजार कोटी दिले तर लोकांना आम्ही दिलासा देऊ शकू.
राज्यपाल : जेव्हा या कंपनी उभ्या राहतात तेव्हा पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार मदत करतेच.
राज ठाकरे : दूधदरवाढीचा विषय शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांनाही दिलासा मिळाला पाहिजे.
राज्यपाल : मी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलेन. या चर्चेत राज्यपाल यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थिती केले.
जाता जाता..
राज्यपाल : राज आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?राज ठाकरे : मै हिंदी पिक्चर बहुत देखता हूँ इसिलिये!