मुंबई : रेल्वे अपघातात २०१६ साली दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय तरुणावर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ६८ वर्षाच्या दात्याच्या हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने त्या तरुणाला आता सर्वसाधारण आयुष्य जगता येणार आहे. रुग्णाची प्रकृती चांगली आहे, येत्या काळात या दोन्ही हातांचा वापर तो रुग्ण करू शकणार आहे. परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्येडॉक्टरांनी या तरुणावर हाताचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे.
आठ वर्षांपूर्वी इंदोर येथे राहणारा हृतिक सिंग परिहार मुंबईला पर्यटनासाठी निघाला असताना इंदोर ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यन त्याचा अपघात झाला. पुण्यातील चिंचवड स्थानकावर गाडी बदलत असताना, गर्दीत चुकून धक्का लागल्याने तो दोन गाड्यांमध्ये जाऊन पडला. या अपघातामुळे दोन्ही हात खांद्यापासून निखळले.
हृतिकचा दृढनिश्चय
अपंगत्वामुळे बऱ्याच मर्यादा येऊनही, हृतिकने दृढनिश्चय करत त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि अभियंता म्हणून नोकरीही मिळवली. त्याच्या घरात तो एकमेव कमावती व्यक्ती होती. त्याने लॅपटॉप आणि मोबाइल फोन वापरण्यासह दैनंदिन कामांसाठी पायांचा वापर करण्यात प्रभुत्व मिळवून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.
तरुणावर ६८ वर्षीय दात्याच्या हाताचे प्रत्यारोपण
हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने ग्लेनईगल्स हॉस्पिटलला भेट दिली. तेथे नाव नोंदणी करून सर्व प्रक्रिया समजावून घेतली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि योग्य दात्याची वाट पाहिल्यानंतर, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही शस्त्रक्रिया पार पडली. इंदोरमधील ६९ वर्षीय दात्याकडून मिळालेला हात हृतिकसाठी योग्य ठरला ३० डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेली ही शस्त्रक्रिया आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच १५ तासांहून अधिक काळ सुरू होती.
१२ पेक्षा अधिक रुग्णांवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. संपूर्ण टीमच्या मदतीने आम्ही रुग्णाच्या रक्तवाहिन्या, नसा आणि हाडे अचूकपणे दुरुस्त करू शकलो, हृतिकला या स्तरावर हात प्रत्यारोपण करणे अत्यंत दुर्मिळ होते. येत्या ९ ते १२ महिन्यांमध्ये या दोन्ही हाताची कार्ये पूर्ववत होणार आहे. याकाळात त्यांना फिजिओथेरपी करावी लागणार आहे. -डॉ. नीलेश सातभाई, हॅन्ड ट्रान्सप्लांट सर्जन, ग्लेनईगल्स हॉस्पिटल