लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनाैत यांच्यातील ईमेल प्रकरण सायबर पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाकडे (सीआययू) वर्ग करण्यात आले आहे. यावर कंगनाने, ऋतिक रोशन एका छोट्याशा अफेअरसाठी कधीपर्यंत रडणार, असे ट्विट केले.
ऋतिकने आपल्याला खासजी ईमेल पाठविल्याच्या आरोपावरून कंगना आणि ऋतिकमध्ये वाद सुरू झाले. ऋतिकने सर्व आरोप फेटाळून कंगनानेच शेकडो मेल पाठविल्याचे सांगितले. पुढे हाच वाद पोलिसांपर्यंत पोहाेचला. २०१६ मध्ये या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अनेक वर्षांपासून रखडलेल्या तपासावर लक्ष द्यावे, याबाबत ऋतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे विनंती केली.
त्यानुसार, हे प्रकरण टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असलेल्या सीआयूयूकडे साेपवण्यात आले आहे. त्यानुसार, सीआययूचे पथक अधिक तपास करत आहे.
* किती वर्षे रडशील? कंगनाचे ट्विट
कंगनाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ‘रडण्याची कहानी पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्षे झाली, पण तो पुढे जाण्यास तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करायलाही तयार नाही. जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तो पुन्हा तेच सर्व नाटक सुरू करतो. ऋतिक रोशन एका छोट्याशा अफेअरसाठी किती वर्षे रडशील?’ असे ट्विट कंगनाने केले.
...................