दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ; लिखाणाचा सराव सुटल्याने मंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:29 AM2021-12-22T05:29:59+5:302021-12-22T05:30:42+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मंगळवारी जाहीर केले. विशेष म्हणजे, यंदा लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये, यासाठी ही वेळ वाढवून दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी प्रत्येकी १५ मिनिटे तर ८० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास, असा वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.
वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले की, मागील वर्षीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे, त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थीहिताचा आहे.
विद्यार्थ्यांना वाढीव वेळ उपयुक्त ठरणार
परीक्षेत वेळेला अन्ययसाधारण महत्त्व आहे. सगळ्यात आधी प्रश्नपत्रिकेचे वाचन व त्यातील सोप्या प्रश्नांवर खुणा करून त्याप्रमाणे पेपर सोडवणे सुरू करावे. योग्य ते प्रश्न, उपप्रश्न क्रमांक नोंदवावेत. विद्यार्थ्यांनी लेखन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावे. तसेच नेमके किती प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे तेवढे सोडले आहेत का याची खात्री करणे आणि नसल्यास पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे. दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण होण्यासाठी वैयक्तिक स्तरावर नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी परीक्षा अगोदर काही नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा लागणार आहे. - महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
१५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
१६ मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च : इंग्रजी
२१ मार्च : हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय
२४ मार्च : गणित भाग - १
२६ मार्च : गणित भाग २
२८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल : समाजशास्त्र पेपर १
४ एप्रिल : समाजशास्त्र पेपर २
बारावीचे वेळापत्रक
वाणिज्य / विज्ञान / कला शाखेतील महत्त्वाचे विषय
४ मार्च : इंग्रजी
५ मार्च : हिंदी
७ मार्च : मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, पंजाबी, तामिळ
८ मार्च : संस्कृत
९ मार्च : ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
१० मार्च : फिजिक्स
१२ मार्च : केमिस्ट्री
१४ मार्च : मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
१७ मार्च : बायोलॉजी
१९ मार्च : जियोलॉजी
११ मार्च : सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१२ मार्च : राज्यशास्त्र
१२ मार्च : अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
१४ मार्च : अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
१९ मार्च : अर्थशास्त्र
२१ मार्च : बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
२३ मार्च : बँकिंग पेपर - १
२५ मार्च : बँकिंग पेपर - २
२६ मार्च : भूगोल
२८ मार्च : इतिहास
३० मार्च : समाजशास्त्र