मुंबई : बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असतानाच आता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी अधिकृतपणे याबाबतची माहिती दिली आहे. बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे.
यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.