मुंबई / नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाºया बारावी बोर्डाच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेचा पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला.मुंबई विभागातील ५८३ केंद्रांवर ३ लाख ४० हजार ८४९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.भरारी पथकाने मुंबई विभागातील मालाडमधील ४ केंद्रे, चेंबूरमधील १, गोवंडीतील २, विक्रोळीतील १, भांडुपमधील २, वसईतील ४, विरारमधील १, मुंब्रा येथील ३ तर पालघरमधील ३ केंद्रांना भेट देऊन तेथील पाहणी केली. विरार येथील केंद्र क्रमांक १०६७ येथील वर्गातील टेबलावर १५ मोबाइल फोन आढळून आले असून, पंचनामा करून हे फोन केंद्रसंचालकांच्या कस्टडीत जमा करण्यात आले. यामध्ये २ विद्यार्थी तर १० परीक्षकांचा समावेश होता.कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार घडला नसून, कॉपीमुक्त परीक्षा झाल्याची माहिती मुंबई विभागीय बोर्डाने दिली. मुंबई विभागात विरार येथील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय हे सर्वात मोठे केंद्र असून, या केंद्रावरील २७१ ब्लॉकवर ६,६४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याठिकाणी केंद्राच्या व्यवस्थापनाचे कौतुक भरारी पथकाकडून करण्यात आले.
मुंबई विभागात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:09 AM