‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’ला खोडा
By admin | Published: February 9, 2016 01:04 AM2016-02-09T01:04:22+5:302016-02-09T01:04:22+5:30
बांधकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या २५ वृक्षांच्या छाटणीसाठी परवानगी देण्याचा अधिकार, पालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सोमवारी जोरदार विरोध केला.
मुंबई : बांधकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या २५ वृक्षांच्या छाटणीसाठी परवानगी देण्याचा अधिकार, पालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सोमवारी जोरदार विरोध केला. विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेनेच भाजपाच्या ‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावला़ त्यामुळे आयुक्तांना अधिकार देण्याऐवजी प्राधिकरणाची बैठक आता दर पंधरवड्याने होणार आहे़ शिवसेनेने अशी ऐन वेळी खेळी केल्यामुळे या वेळेस भाजपाची बोलती बंद झाली आहे़
एकमेकांच्या प्रकल्पांमध्ये खोडा घालण्याची स्पर्धा शिवसेना-भाजपा या मित्रपक्षांमध्येच सुरू आहे़ याचा फटका ‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’ या भाजपाच्या प्रकल्पालाही बसणार आहे़ या प्रकल्पांतर्गत बांधकामांच्या आड येणारे प्रत्येकी २५ वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात येणार होते़ वृक्ष प्राधिकरण समितीची बैठकी दीड महिन्यांनी होत असल्याने प्रस्ताव रखडून राहतात़ या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’मध्ये असे धोरण आखण्यात आले होते़
वृक्षछाटणीचे अधिकार आयुक्तांना देण्याऐवजी दर १५ दिवसांनी बैठक घ्यावी, अशी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांची उपसूचना मान्य करण्यात आली़ त्यामुळे बघ्याची भूमिका घेण्याची वेळ भाजपावर आली़ (प्रतिनिधी)