Join us

मिठीसमोर अडथळ्यांची शर्यत! सफाई रखडली : पालिकेचे दुर्लक्ष

By admin | Published: December 06, 2014 1:00 AM

मिठी नदीला साबरमती फ्रंट लूक देण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून मिठी नदीची साफसफाई ९९.९१ टक्के झाल्याचा दावा करणारी मुंबई महापालिका पावसाळ्यानंतर मात्र मिठी नदीकडे फिरकलीच नाही

सचिन लुंगसे, मुंबईमिठी नदीला साबरमती फ्रंट लूक देण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून मिठी नदीची साफसफाई ९९.९१ टक्के झाल्याचा दावा करणारी मुंबई महापालिका पावसाळ्यानंतर मात्र मिठी नदीकडे फिरकलीच नाही. तर मिठी नदीचे रुंदीकरण करणाऱ्या एमएमआरडीएने मिठीकडे साफ कानाडोळा केला आहे. परिणामी वाकोल्यापासून कुर्ला पश्चिमेकडील जुना आग्रा रोडलगतच्या भंगार विक्रेत्यांनी मिठीलगत हातपाय पसरले आणि रुंदावलेल्या मिठीच्या प्रवाहात पुन्हा अडथळे आले. २६ जुलै २००५ रोजी पावसामुळे मिठीला पूर आल्यानंतर ताळ्यावर आलेल्या मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई पालिकेने मिठी रुंदावण्यासह तिच्या साफसफाईची योजना आखली. आजपर्यंत मिठीच्या साफसफाईवर एमएमआरडीए व पालिकेने १ हजार ५७ कोटी रुपये खर्च केले. गेल्या नऊ वर्षांपासून प्रत्यक्षात झालेले रुंदीकरण वगळता मिठीची साफसफाई वरवर झाली. मिठी नदीतून काढलेला गाळ नक्की टाकायचा कुठे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. मात्र त्यावरही तोडगा काढण्यात आला. कधी कधी तर ज्या कंत्राटदाराला मिठीच्या साफसफाईचे कंत्राट मिळाले आहे; त्यांच्या डम्परने काढलेला गाळ परत मिठीतच टाकण्यात धन्यता मानली आणि अशा तक्रारीही आल्या. विशेषत: क्रांतीनगर परिसरातून या तक्रारी येण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु पालिका प्रशासनाने याबाबत कंत्राटदाराला काहीच तंबी दिली नाही.भंगारवाल्यांनी घेरले....नऊ वर्षांच्या काळात जुना आग्रा रोडवरील भंगारवाल्यांनी पुन्हा मिठीच्या परिसरात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. विशेषत: कलिना परिसरातील भंगारवाल्यांनी मिठीच्या काठावर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा आधार घेत दुकानांच्या परिसरात शेड उभारल्या आहेत. भंगार दुकानांतून सोडले जाणारे सांडपाणी वेगळेच आणि भंगाराचा कचरा वेगळाच. अशा गोष्टी कुणाचीही पर्वा न करता मिठी नदीत सोडल्या जात असून, कुर्ला डेपोपासून वांद्रे परिसरात जाताना नजरेस पडेल असे प्रदूषण भंगारवाल्यांकडून मिठी नदीत केले जात असल्याचे स्पष्ट चित्र आहे.अतिक्रमण रोखण्याबाबत एमएमआरडीएचे दुर्लक्ष कलिना येथील मिठी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आहे. याबाबत हरित लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने नदीलगत कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. मात्र अपेक्षित कारवाई झाली नाही. एमएमआरडीएने नदीलगत भिंत बांधली. नदीत स्फोट केले. परिणामी नदीच्या जैविक विविधता धोक्यात आली. नदीलगतचे अतिक्रमण रोखण्यासाठी एमएमआरडीएने काहीच केले नाही, असे पर्यावरणतज्ज्ञ जनक दफ्तरी यांनी सांगितले.भंगारवाल्यांसमोर प्रशासन झुकले१.  मध्यंतरीच्या काळात मिठी नदीच्या रुंदीकरणाचा घाट घातलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने साफसफाईबाबत मात्र आपले हात वर केले. परिणामी मिठीच्या साफसफाईचे काम अंगावर येऊन पडलेल्या पालिकेने याबाबत हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु सरतेशेवटी या वादावर तोडगा निघत पालिकेने मिठीच्या साफसफाईची भूमिका बजावली. पावसाळ्याचे चार महिने मिठी साफ करणे अशक्य असल्याने एप्रिल आणि मे महिन्यांत पालिकेने मिठीच्या ‘साफसफाई’चा घाट घातला. परंतु ही साफसफाई कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर, जुना आग्रा रोडलगतच्या झोपडयांचा परिसर आणि वाकोला अशा दर्शनी भागातच झाली.२. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जेव्हा मिठीच्या रुंदीकरणाचा घाट घातला होता; तेव्हा या मिठीच्या रुंदीकरणाला सौंदर्यीकरण असे नाव दिले होते. मात्र गेल्या नऊ वर्षांत मिठीलगत कुठेच सौंदर्य पाहण्यास मिळाले नाही. उलटपक्षी मिठीच्या काठावरील भंगारवाल्यांकडून प्रदूषण वाढतच गेले. या सर्वांना आवर घालण्यासाठी पालिका कारवाई करू शकली असती. परंतु मिठीची साफसफाई करणाऱ्या प्रशासनाला भंगारवाल्यांची दादागिरी मोडीत काढता आली नाही.३.पावसाळ्यापूर्वीची एप्रिल व मे या महिन्यांतील मिठीची साफसफाई वगळता मिठीच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेसह एमएमआरडीएने पुरेसे प्रयत्न केले नाहीत. नऊ वर्षांत मिठीच्या नदीच्या साफसफाईवर झालेल्या खर्चाचा तपशीलदेखील माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी मागविला. या माहितीवर पुन्हा पुन्हा मिठीच्या साफसफाईसाठी निवेदने आणि भेटीगाठी देण्यात आल्या. परंतु मिठीची साफसफाई दिखाव्यापुरती झाली.