तरुणीला भररस्त्यात मारली मिठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:13+5:302020-12-17T04:34:13+5:30
- दिंडोशी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाडमध्ये एका २४ वर्षांच्या तरुणीला मिठी मारत तिचा विनयभंग करण्याचा ...
- दिंडोशी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडमध्ये एका २४ वर्षांच्या तरुणीला मिठी मारत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी कल्पेश गोपीनाथ देवधरे (३०) नामक माथेफिरूला अटक केली, जो अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
मालाडमध्ये पीडित तरुणी ११ डिसेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ६च्या सुमारास दुकानात काही सामान आणण्यासाठी गेली होती. तेव्हा मोटारसायकलवर असलेल्या देवधरेने तिला पाहिले. त्याने तिचा पाठलाग करत, तिच्याशी जबरदस्ती गप्पा मारू लागला. त्यामुळे पीडित घराच्या दिशेने जाऊ लागली, तेव्हा देवधरेने तिला थेट मिठीच मारली. या प्रकरणी तिने दिंडोशी पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ.डी.एस. स्वामी आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फड आणि त्यांच्या निगराणी पथकाने स्थानिक सीसीटीव्हीची पडताळणी केली. अखेर तांत्रिक तपास करत कांदिवलीच्या डहाणूकरवाडीतून देवधरे याच्या मुसक्या आवळल्या. देवधरेवर चुनाभट्टी, बांगुरनगर, गोरेगाव, पार्क साइट, डी.एन.नगर, दिंडोशी, कांदिवली, पंतनगर आणि पवई पोलीस ठाण्यात मिळून १२ गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.