Join us  

छुप्या युतीची जोरदार चर्चा !

By admin | Published: February 04, 2017 8:58 PM

राजकीय पक्षांची धावपळ वाढली : शिवसेना, भाजपच्या नेतेमंडळींची जिल्ह्यातील काही जागांवर खेळी! -- वजाबाकी

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची धावपळ वाढली असून, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होणार आहे. २६ जानेवारीला मुंबई वरळी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसह राज्यात यापुढे कोणत्याही निवडणुकीत सहकारी भाजपसमवेत युती न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाइलाजाने का होईना सिंधुदुर्गातील शिवसेनेने आपली वेगळी चूल मांडल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत शिवसेना आणि भाजपने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात असतानाही आता सिंधुदुर्गात उघड युती करता येणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे पुढारी काही जागांसाठी ‘छुपी युती’ करून लढण्याच्या मन:स्थितीत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. गेल्या २० वर्षांच्या इतिहासात नारायण राणे शिवसेनेत असताना सिंधुुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकला होता, ते वगळता येथील सत्ता पूर्णपणे काँग्रेसकडे राहिली आहे. यावेळी शिवसेना-भाजपचे सरकार देशात आणि राज्यात विराजमान आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवावा अशी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मागील महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले होते की, ज्या ठिकाणी सेना-भाजपची युती झाली तेथे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यावेळीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक युती करून लढण्याची भूमिका दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी बोलून दाखविली होती. त्यातूनही पुढे जात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी दोन ते तीनवेळा चर्चा करून जागावाटपापर्यंतची बोलणीही झाली होती.मात्र, आपण पहिल्यापासून वर्तविलेल्या संकेतानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणावर मुंबईतील राजकारणाचा मोठा प्रभाव कायमच राहिलेला आहे. जिल्हा परिषदेबरोबर महापालिकांच्या निवडणुकाही होत असल्याने आणि मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने पक्षप्रमुखांच्या निर्णयाचा आदर करत शिवसेनेने सिंधुदुर्गात स्वतंत्ररीत्या लढण्यासाठी पुढे पावले टाकली आहेत. त्यातूनच जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी मालवणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर करत शिवसेनेने सिंधुदुर्गच्या राजकारणात एक पाऊल पुढे टाकले होते.वैभव नाईक यांनी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आणि उमेदवारांची यादीही जाहीर केली. मात्र, ही यादी देवगड, मालवण, कणकवली, वैभववाडी आणि कुडाळ या पाच तालुक्यांमधीलच होती. उर्वरित सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक रणनीतीबाबत पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी भूमिका मांडली. त्यात शिवसेना कोणतीही छुपी युती न करता स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले पालिकेत शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर भाजपशी युती करण्याबाबतची भूमिका दीपक केसरकर यांनी वारंवार मांडली होती. आता मात्र त्यांची मोठी गोची झाली आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे केसरकरांना आता मनात असतानाही युती करताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे याबाबत केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नव्हती, परंतु आता उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस असल्याने आता ते शेवटच्या दोन दिवसांत याबाबत योग्य तो निर्णय घेतील.शिवसेनेनंतर काँग्रेसचा विचार करता काँग्रेसची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांची यादी जरी तयार असली, तरी जाहीर करण्याचा धोका काँग्रेस नेत्यांनी पहिल्या टप्प्यात घेतला नव्हता. कारण सर्वांत जास्त इच्छुक उमेदवार काँग्रेसकडे होते आणि उमेदवारी जाहीर झाली की नाराजी वाढणार आणि नाराज इतर पक्षांत जाणार असा धोका होता. त्यामुळे काँग्रेसने शुक्रवारी ७५ टक्के उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरी यादी रविवारी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्लेतील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना भावनिक आवाहनही केले. इच्छुक असलेल्या सर्वांनाच मी उमेदवारी देऊ शकत नाही. यातून मात्र नाराज किंवा नाउमेद होण्याची गरज नाही. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असल्यासारखे कामाला लागा. विजय आपलाच आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रान उठवा. उमेदवार निवडून आल्यावर जे इच्छुक होते त्यांचा पक्षाकडून सन्मानच केला जाईल, अशी साद घालत संभाव्य बंडखोरांना उमेदवारीअगोदरच थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नारायण राणेंची ही साद किती जण ऐकतात? त्यातून बंडखोरी शमविण्यात काँग्रेसला यश येते का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदांमधून वारंवार भूमिका मांडली आहे की, राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजप नेत्यांना सिंधुदुर्गात काँग्रेसविरोधात स्वतंत्रपणे लढणे शक्य नाही. त्यामुळे काही ठिकाणी छुपी युती होणार आहे. आपण लवकरच जिल्ह्यातील छुपी युती असलेल्या जागांची यादीच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.त्यामुळे शिवसेना-भाजपच्या छुप्या युतीबाबतची चर्चा सध्या सिंधुदुर्गासह राज्याच्या राजकारणात चर्चिली जात आहे. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राणेंना प्रत्युत्तर देताना राणे काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आपण युती करणार असल्याचे जाहीर सांगितले होते.भाजपचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा देवगड मतदारसंघात पहिल्यापासूनच बोलबाला राहिला आहे. देवगड विधानसभा मतदारसंघातून आप्पासाहेब गोगटे यांनी भाजपचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे पुतणे अ‍ॅड. अजित गोगटे यांनी एकदा विधानसभेत भाजपचे प्रतिनिधित्व केले, तर आतापर्यंत भाजपचे जिल्हा परिषदेतील अस्तित्व देवगड तालुक्यातूनच राहिले आहे. माधव भांडारी म्हणा किंवा जिल्हा परिषद सदस्य सदाशिव ओगले यांनी काहीकाळ उपाध्यक्ष म्हणूनही जिल्हा परिषदेत भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत ५० जागा असलेल्या जिल्हा परिषदेत हाताच्या बोटावर मोजण्याएवढे प्रतिनिधी भाजपचे होते. यावेळी मात्र राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असल्याने जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यातून भाजप निवडणुकीला सामोरा जाणार आहे.मागील महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षाही जोरदार मुसंडी मारली होती. काँग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, तर वेंगुर्ले नगरपरिषदेच्या इतिहासात थेट नगराध्यक्ष निवडून आणून भाजपने चमत्कारच घडविला. यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली यांनी मेहनत घेतली होती.असा काहीसा चमत्कार जिल्हा परिषद निवडणुकीत घडविण्यासाठी भाजपने जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैभववाडीत अतुल रावराणेंसारख्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने प्रवेश दिला. तसेच काँग्रेसचे सावंतवाडी पंचायत समितीतील उपसभापती महेश सारंग यांनाही गेल्या आठवड्यात भाजप प्रवेश देण्यात आला. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील नाराज संदेश पारकर यांना भाजपने पक्षात घेत नगरपालिका निवडणुकीत जबाबदारी दिली होती. त्यात पारकर भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी ठरले आहेत, तर नारायण राणे यांचे एकेकाळचे विश्वासू शिलेदार राजन तेली यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश देत राज्य पातळीवर प्रदेश चिटणीस हे पद दिले आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत नाराज लोकांना हेरून भाजप यावेळीदेखील जिल्हा परिषदेला मोट बांधणार आहे. राष्ट्रवादीचा विचार करता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे. दिवसेंदिवस हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नेते राष्ट्रवादीकडे राहिले. त्यामुळे त्यांनी आता कितीही स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना यश मिळविणे कठीण जाणार आहे. त्यामुळे राजकारणातील धूर्त आणि द्रष्टा नेता म्हणून परिचित असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी स्थानिक पातळीवर जुळवून घ्या आणि आघाडीबाबत चर्चा करा, असा आदेशच देऊन टाकला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीची नेतेमंडळी आता आघाडीबाबत काँग्रेस नेत्यांशी बोलणी करत आहेत. मात्र, अजूनही याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचा ग्रामीण भागात वरचष्मा राहिला आहे. काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत. ती खोदून काढायची असतील तर शिवसेना आणि भाजपने युती करूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या पक्ष आदेशाला डावलून आता सिंधुदुर्गात सेना-भाजपची उघड युती होणे शक्य नाही. मात्र, राणेंच्या गडाला हादरा देण्यासाठी तेवढी राजकीय ताकद निर्माण करणे शिवसेना आणि भाजपला सोपे नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची नेतेमंडळी जिल्ह्यातील काही जागांवर छुपी युती करून निवडणूक लढण्याची रणनीती आखत आहेत. या युतीबाबत कोणीही जाहीर वाच्यता करणार नाही. मात्र, प्रत्यक्षात अशा काही जागा एकमेकांना मदत करण्यासाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळची जिल्हा परिषद निवडणूक मागील काही निवडणुकांप्रमाणेच नारायण राणे पर्यायाने काँग्रेस विरोधात त्यांचे सर्व राजकीय विरोधक अशीच होताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील निवडणुकांचा विचार करता नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटूनही राणेंनी त्यांचा पराभव केला आहे. याला काही घटना अपवादही आहेत. त्यामुळे काँग्रेसची नेतेमंडळी सध्या आपापल्या भागातील प्रचार कार्यात मग्न आहेत. जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेते काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी अध्यक्ष आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी अध्यक्ष संदेश सावंत, विकास कुडाळकर, रणजित देसाई, दिनेश साळगावकर, सुदन बांदिवडेकर, अस्मिता बांदेकर, संजू परब, मनीष दळवी यांसारखी मातब्बर नेतेमंडळी सध्या कोणत्याही विषयावर भाष्य न करता निवडणुकीच्या कामाला लागली आहेत. त्यांना ज्ञात आहे की शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि नाही झाली तर आपल्याला या सर्वांच्या विरोधातच काम करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आपापल्या भागातील मतदारसंघात ही नेतेमंडळी निवडणुकीची तयारी करत आहेत.महेश सरनाईकप्रचारासाठी मिळणार केवळ सहा दिवसांचा कालावधी