Join us

एफडी मोडून रुग्णांमध्ये फुंकतोय 'प्राण', भांडुपच्या 'ऑक्सिमॅन'चं विशाल योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:39 AM

भांडुपचा 'ऑक्सिमँन' स्वतःची एफडी मोडून पुरवतोय श्वास...

ठळक मुद्देसौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड अडवून ठेवावे लागणार नाहीत आणि गंभीर रुग्णाना सदरील बेड मिळू शकतील असे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकड़ून समजताच विशालने अनेक परदेशी कंपन्यांसोबत चर्चा करून काही ऑक्सिजन काँसंट्रेटरची मागणी केली

मनीषा म्हात्रे

मुंबई : कोरोनाच्या या संकटात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. राज्यात सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा भासत होता. ऑक्सीजन अभावी रुग्ण दगावत होते. अशातच भांडुपकर असलेल्या विशाल कडणे याने आपल्या डॉक्टर ऑफ लिटरेचर शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून गरजूंना ऑक्सिजन काँन्सट्रेटर मशीन उपलब्ध करुन देत माणुसकीचे नाते जपले आहे. सध्या भांडुपचा ऑक्सिमँन म्हणून विशालची ओळख बनली आहे. त्यांंच्या या प्रयत्नांमुळे आतापर्यंत १२ हून अधिक कोरोना बाधितांचे प्राण वाचले आहेत. 

भांडुपचा रहिवासी असलेला विशाल हा मुंबई हाऊसिंग फेडरेशनमध्ये संचालकपदी कार्यरत आहे. सुरूवातीपासूनच समाजसेवेचे वेड असलेल्या विशालने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मोफत ५ हजार मास्क, ५०० ऑक्सिमीटर, अन्नधान्य अशा अनेक जीवनोपयोगी गोष्टी गरजूंना पुरविल्या. आजही त्याची ही जनसेवा सुरु आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता. अशात, विशालने ऑक्सिजनच्या कमतरतेवर एक उपाय म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिजन काँन्सट्रेटर मागवण्याचे ठरवले. या यंत्रांमुळे ऑक्सिजन बेडच्या कमतरतेला एक पर्याय उपलब्ध होत आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची ही यंत्रे महाग असून अधिक तर परदेशामध्येच बनविली जातात. 

ऑक्सिजन सिलेंडरला एक सर्वोत्तम पर्याय म्हणून हे यंत्र घरी वापरता येऊ शकते. त्यामुळे सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड अडवून ठेवावे लागणार नाहीत आणि गंभीर रुग्णाना सदरील बेड मिळू शकतील असे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकड़ून समजताच विशालने अनेक परदेशी कंपन्यांसोबत चर्चा करून काही ऑक्सिजन काँसंट्रेटरची मागणी केली. मात्र, या मशीन महाग असल्याने विशालने आपल्या शिक्षणासाठी ठेवलेल्या एफडी मोडून या मशीन खरेदी केल्या. विशालला डॉक्टर ऑफ लिटरेचरची पदवी घ्यायची आहे. कोरोनामुळे शिक्षण थांबले. अशात, विशाल याच शिक्षणासाठी जपून ठेवलेल्या रक्कमेतून आतापर्यंत एकूण १२ मशीन खरेदी केल्या असून त्या गरजू रुग्णापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्ये आतापर्यंत या मशीनची सेवा पुरविण्यात आली आहे. आजही दिवसभर स्वतःचे काम उरकून विशाल गरजू लोकांपर्यंत मोफत सेवा पुरवित आहे.

प्रत्येकाने ख़ारिचा वाटा उचलायला हवा...सध्याची परिस्थिती ही खूपच बिकट आहे.  अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना मदतीचा हात पुढे केला तरच कोरोनाच्या अशा महाभयंकर परिस्थितीशी सामना करू शकतो. माझ्याप्रमाणेच इतरांनी देखील खारीचा वाटा उचलून सामाजिकतेचे भान जोपासावे असे आवाहनही विशालने केले आहे.

दादा घरातले धान्य संपले...कोरोना काळात सुरु असलेल्या अविरत सेवेमुळे त्याला कुणा ना कुणाचे तरी हक्काने कॉल येतात. मंगळवारीही अशाच प्रकारे एकाने कॉल करून दादा घरातले धान्य संपल्याचे विशालला सांगितले. विशालने तात्काळ त्यांच्यापर्यंत मदत पोहचवली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याऑक्सिजनभांडुप पश्चिमनिधी