Join us  

उमेदवार नसताना 'आम आदमी पार्टी'च्या सभेला प्रचंड गर्दी; 'मविआ'ला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:01 PM

वांद्रे पश्चिम येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वतःच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी वांद्रे पश्चिम येथे 'आम आदमी पार्टी' ने पुढाकार घेत लावलेल्या जाहीर सभेला रविवारी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. त्यामुळे या सभेची आणि आम आदमी पक्षाची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

यंदा मुंबईतील सहापैकी एकही लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीने आपला उमेदवार उभा केलेला नाही. संविधान वाचविण्यासाठी आपने इंडिया आघाडीला पाठिंबा देत घरोघरी प्रचार सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर मध्य मुंबईत आपचे मुंबई उपाध्यक्ष मेहमूद देशमुख यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी रविवारी पटेल नगर, वांद्रे पश्चिम येथे जाहीर सभा घेतली. यावेळी माजी नगरसेवक राजा राहाबेर, उद्धव सेनेचे संघटक सुदेश दुबे, आपचे १०२ वॉर्डचे अध्यक्ष नसीब खान मंचावर उपस्थित होते. 

दरम्यान, या सभेस उत्स्फूर्तपणे मतदारांनी गर्दी करीत वस्तीमधील रेल्वेच्या जागेचा प्रश्न. झोपडपट्टी पुनर्वसन, सोई सुविधाना स्थानिक आमदार प्राध्यान्य देत नसल्याने नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे येथील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्धार केला. कोणतीही अधिकची तयारी नसताना नागरिकांनी लावलेल्या उपस्थितीबद्दल येथे जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे पटेल नगर परिसर हा भाजपा आमदार आशिषशेलार यांच्या मतदार संघात येतो. त्यामुळे आपच्या जाहीर सभेची भाजपा गटात ही चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईआपमहाविकास आघाडी