शनिवार, रविवार आणि सोमवारी असलेला नाताळ अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने लोक कुटुंबकबिल्यासह फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. यापैकी अनेकांकडून पर्यटनस्थळी जाण्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. काल सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्णपणे जाम झाला आहे. तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा तासनतास खोळंबा होत आहे.
याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेसवेवर एवढी वाहतूक कोंडी झालेली आहे की, ज्यामुळे तीन किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी तीन तास बारा मिनिटांचा वेळ गुगल मॅप दाखवत आहे. अनेक लोक वाटेत अडकून पडले आहेत. वाटेत त्यांना खाण्यापिण्याची किंवा थांबण्याची कुठलीही सोय नाही आहे. एक्स्प्रेस वेवरील गर्दी कमी करण्यासाठी निदान टोल तरी बंद करावा आणि लोकांना लवकरात लवकर पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी प्रवासी करत असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने फोनवरून दिली आहे.
दरम्यान, नाताळनिमित्त शनिवार ते सोमवार सलग सुट्या आल्या आहेत. हीच संधी साधत मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी मुंबईबाहेर जात आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना दुपारी १२ पूर्वी प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांचा प्रवास कोंडीमुक्त होण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली. सलग सुट्यांमुळे अनेकदा वाहनांची घाटात कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी अवजड वाहनांना थांबविण्यात येते. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात, असे सिंगल यांनी सांगितले.