लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला होळी- बेणापट्टी समुद्रकिनारी मंगळवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत भरतीच्या पाण्यासोबत वाहत आला. हा महाकाय व्हेल मासा सुमारे ४० ते ५० फूट लांबीचा आणि दहा टन वजनी असून तो सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीच समुद्रात एखाद्या मोठ्या बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
बऱ्याच महिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. या व्हेल माशाची माहिती स्थानिक रहिवासी वेलकनी डिसोझा आणि पायस अंकल यांनी लागलीच वसई पोलीस, वसई विरार महापालिका प्रशासन व मत्स्य विभागाला देत सहकार्य केले. मत्स्य विभाग तसेच इतर यंत्रणाच्या मदतीने या माशाची याच समुद्रकिनारी विल्हेवाट लावली जाईल, असे समजते.
अर्थातच येथील बेणापट्टी समुद्रकिनाऱ्यावर या माशाची लागलीच व्हिलेवाट लावणे गरजेचे आहे किंबहुना या माशांचा ब-याच दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याने आणि मासा पाण्याबाहेर आल्याने त्याची हळूहळू दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
--------------------