सागर नेवरेकर मुंबई : गोरेगाव (पश्चिम) परिसरात रात्रभर चालणा-या बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि बारमुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत उच्चपदस्थ पोलीस अधिका-यांना निवेदने सादर करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मोतीलाल नगर, लिंक रोड, एस. व्ही. रोड, जवाहर नगर या ठिकाणी रात्रभर चालणाºया अनेक बेकायदेशीर हुक्का पार्लर व बारमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांनी केली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने गुन्हा अन्वेषण विभागाअंतर्गत येणाºया समाजसेवा शाखेला पिकासो, कसबा, चांबुरी (काफिला), फिस्ट इंडिया, रॉयल, चायपानी आणि चाओस या हुक्का पार्लरना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करणारे पत्र जून २0१७मध्ये पाठवूनही पोलीस या हुक्का पार्लरना संरक्षण देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गोरेगाव परिसरात अनधिकृतपणे अनेक हॉटेलमध्ये अनधिकृत हुक्का पार्लर चालवण्यात येत आहे. या हुक्का पार्लरनी या परिसरात धुडगूस घातला आहे. यातील केओस, चायपानी आणि रॉयल या हुक्का पार्लरवर तर आरोग्य विभागाने अनेकदा कारवाई केली असून, तसे पत्र ७ जून २0१७ रोजी गोरेगाव पोलिसांना पाठवले आहे. तरीही पोलीस कारवाई करीत नसल्याने येथील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. रात्रभर ग्राहकांकडून धुडगूस घातला जातो आणि याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबत येथील रहिवासी किशोर साळवी, प्रसाद मुळ्ये, प्रवीण नलावडे, एस. जे. नाईक, सीकांत सावंत, जावेद मेमन, इक्बाल नानजी, जाफर शेख, कमलेश शेट्टी यांनी सह्यांचे निवेदन उच्चपदस्थ पोलीस अधिकाºयांना सादर केली आहेत.किओस हुक्का पार्लर येथे एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीदेखील हे हुक्का पार्लर बंद झालेले नाही. पीडित तरुणी कूपर रुग्णालयात दाखल असताना जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान संस्थेची मदत मिळाली. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी पोलिसांसोबत पीडित तरुणीची भेट घेण्यास गेले असता, झालेल्या प्रकाराची माहिती तरुणीने दिली. त्यानंतर पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी दिली. दरम्यान, हुक्का पार्लर मालकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. तसेच तरुणपिढी व्यसनाकडे ओढली जात आहे. यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक, संस्थांकडून केली जात आहे.
हुक्का पार्लरनी गोरेगाव गुदमरले, बेकायदेशीर हुक्का पार्लरचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:41 AM