Join us

मनुष्याचे नाते जंगलाशी, तर बांबूचे नाते हे शेवटच्या क्षणापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:41 AM

सुधीर मुनगंटीवार : ‘वर्ल्ड ग्रीन कॉन्व्हेर्गेन्स २०१८’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने बांबू संवर्धनासाठी १२९० कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. वर्ल्ड बांबू सेटम गार्डन आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तयार करण्यात आले आहे. बांबूपासून विविध स्वरूपात रोजगार उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मनुष्याचे नाते जंगलाशी आहे, बांबूचे नाते हे शेवटच्या क्षणापर्यंत आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ल्ड ग्रीन कॉन्व्हेर्गेन्स २०१८ या कार्यक्रमावेळी केले.

बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शनिवारी ‘वर्ल्ड ग्रीन कॉन्व्हेर्गेन्स २०१८ - वर्ल्ड बांबू सेटम अ‍ॅण्ड गार्डन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ४३ देशांच्या राजदूतांनी यात सहभाग घेतला. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बांबूच्या विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आणि वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, जगातील १९३ देशांपैकी साधारण ६३ देशांचे राजदूत मुंबईमध्ये राहतात. या ६३ देशांच्या राजदूतांच्या संघटनेने इच्छा व्यक्त केली की, राज्याचा वनविभाग ज्या पद्धतीने काम करतोय; त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि हे काम समजून घ्यायचे आहे. या वेळी पोलंड देशाच्या राजदूतांनी सांगितले की, वनविभागाच्या कामाची माहिती घेऊन सादरीकरण द्यायचे आहे.राज्यामध्ये बांबू बोर्ड, बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर आणि राज्यातील विद्यापीठांमध्ये बांबूसंबंधित छोटे छोटे कोर्सेस सुरू केले आहेत. बांबू ही वृक्षांची प्रजाती नसून गवताची प्रजाती आहे. इस्रायलपासून ते ब्राझीलपर्यंत आणि न्यूझीलंडपासून ते पोलंडपर्यंत हे सर्व देश त्यांच्याकडील पर्यावरणाचे संतुलन संरक्षण करण्यासाठी जे तंत्र वापरतात, ते आपल्याला मोफत देणार आहेत.आदिवासी बांधवांचे निवेदन : महाराष्ट्र वनविभाग मंत्रालयातर्फे बांबू सेटम गार्डन उद्घाटनावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बांबूच्या विविध प्रजातींचे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमानंतर येथील आदिवासींच्या विविध समस्या तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याबाबत ‘बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचे’ अध्यक्ष देवेंद्र ठाकूर यांनी एक निवेदन सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपुर्द केले.

या प्रजातींची लागवडआसाम राज्यात बांबूच्या ३०, अरुणाचल प्रदेश ७४, सिक्किम १५, मेघालय १०, मणिपूर ३५ आणि छत्तीसगडमध्ये ७ ते ८ प्रजाती आढळून येतात. यापैकी प्रत्येक राज्यातून निवडक ९४ बांबूच्या प्रजाती नॅशनल पार्कात आणून त्यांची लागवड करण्यात आली आहे.

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार