माहुल प्रकल्पग्रस्तांचे मानवी साखळी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:33 AM2018-11-12T02:33:47+5:302018-11-12T02:34:04+5:30
रहिवाशांची मागणी : सुरक्षित ठिकाणी घर द्या; आंदोलनकर्त्यांचा सहभाग
मुंबई : ‘माहुल में घर के नाम पर, स्मशान घाट भेजा’, ‘संघर्ष हमारा नारा है’ अशा घोषणा हातात पोस्टर, बॅनर घेऊन माहुल प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी घाटकोपर येथे दिल्या. रविवारी घाटकोपर पूर्वेकडील सिंधूवाडी ते घाटकोपर पश्चिमेकडील कामा लेनपर्यंत मानवी साखळी तयार करून त्यांनी आंदोलन केले. यात ५०० पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांचा सहभाग होता. प्रदूषणाने पीडित झालेल्या प्रत्येक रहिवाशाने आंदोलनात सहभाग घेऊन घोषणा दिल्या.
माहुल प्रकल्पग्रस्तांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माहुल येथील नागरिक रोगांनी ग्रस्त झाले असून अनेक रहिवाशांचा मृत्यू ओढवला आहे. माहुल प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी घर मिळण्यासाठी मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, माहुलमध्ये मागील २ वर्षांत ५०० पेक्षा जास्त नागरिक आजारी झाले आहेत. १५ पेक्षा जास्त उद्योगांच्या माध्यमातून विषारी रसायने पाण्यात आणि हवेत मिसळत आहेत. माहुलवासीयांना पोटाचे आजार, त्वचारोग, फुप्फुसाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. असंवेदनशील सरकारला जाग येण्यासाठी माहुलवासीयांचे २८ आॅक्टोबरपासून विद्याविहार येथील आंबेडकर नगर २ येथे ‘जीवन बचाव आंदोलन’ सुरू आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सुरक्षित जीवन मिळावे, अशी माहुलवासीयांची इच्छा आहे.
रासायनिक वायुप्रदूषणामुळे माहुल परिसर राहण्यायोग्य नसतानाही महापालिका व सरकारी प्रशासनांकडून मुंबईतील विविध भागांतील प्रकल्पग्रस्तांना माहुलसारख्या अतिप्रदूषित भागात स्थलांतरित करण्यात आले. याविरोधात रहिवाशांनी नुकतीच ‘काळी दिवाळी’ साजरी केली. उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही अन्यत्र पर्यायी घरे देण्यास किंवा भाड्याची रक्कम देण्यास सरकार असमर्थता दर्शवत आहे. राज्य सरकारचा तीव्र निषेध माहुलवासीयांकडून करण्यात आला.
‘लढेंगे और जितेंगे...’
माहुलवासीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे. सरकारचे माहुलवासीयांकडे दुर्लक्ष होत आहे. रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे माहुलवासीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रदूषणाने घेतले बळी
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्त आणि तानसा जलवाहिनी प्रकल्पात घर गमावलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र माहुलला राहायला आल्यापासून येथील अनेक नागरिकांचा प्रदूषणामुळे जीव गेला. तसेच इथल्या दूषित वातावरण आणि हवेमुळे अनेक प्रकल्पग्रस्तांना आजार जडले आहेत.
माहुल प्रकल्पग्रस्त आधी ज्या भागात राहत होते तेथे जवळपासच्या भागात प्राथमिक सोयी-सुविधा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. आता पुनर्वसनाच्या नावाखाली शहर आणि उपनगरापासून १२ ते १५ किमी दूर फेकले गेल्याने रोजंदारी, मुलांच्या शाळा येथे ये-जा करण्यास जादा प्रवास खर्च येतो. त्यात अशुद्ध हवा आणि पाण्याचे सेवन केल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे आता सरकार किती जणांचे नाहक जीव घेणार आहे, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.