Join us  

पोईसरमध्ये दोन हजार ख्रिस्ती बांधवांची मानवी साखळी

By admin | Published: May 23, 2016 3:31 AM

कांदिवली पश्चिम येथील पोईसर डेपोसमोरील सुमारे सहाशे वर्षांपूर्वीच्या लेडी रेमेडी चर्चच्या क्रॉसवर आणि येथील दफनभूमीवर हातोडा मारण्याची नोटीस पालिकेच्या

मुंबई : कांदिवली पश्चिम येथील पोईसर डेपोसमोरील सुमारे सहाशे वर्षांपूर्वीच्या लेडी रेमेडी चर्चच्या क्रॉसवर आणि येथील दफनभूमीवर हातोडा मारण्याची नोटीस पालिकेच्या पी (दक्षिण) विभागाने जारी केली आहे. त्याच्या निषेधार्थ रविवारी परिसरात सुमारे २ हजार ख्रिस्ती बांधवांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. या वेळी पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करून जाणीवपूर्वक हे कुभांड रचण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. कांदिवली येथे १५५० साली बांधण्यात आलेल्या लेडी रेमेडी चर्चच्या क्रॉसवर आणि येथील दफनभूमीवर पालिकेला रस्ता बांधायचा आहे. मात्र त्याविरोधशत पश्चिम उपनगरातील ख्रिस्ती बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गार्डियन्स युनाटेड या संस्थेचे रॅम्सी रिबेलो यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मार्केटसमोर करण्यात आलेल्या मानवी साखळीत ‘सेव्ह अवर लॅण्ड’च्या डॉल्फी डिसोझा, गर्ग परेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा, द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशनचे ब्रायन परेरा, सहार फोरम असोसिएशन सहभागी होते. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन ख्रिस्ती धर्माच्या नागरिकांबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व डॉल्फी डिसोझा यांनी केला. येथे उभ्या राहत असलेल्या ३२ मजली इमारतींना रस्ता मिळावा, यासाठी पालिकेने येथील पुरातन क्रॉसवर आणि दफनभूमीवर हातोडा मारण्याचा घाट घातल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ग्रेड -२ पुरातन वास्तूवर पालिका कोणत्या आधारावर हातोडा मारणार, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)