कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा प्रतिसाद मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:31+5:302020-12-30T04:08:31+5:30
जे.जे., सायन रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीत सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांचा ...
जे.जे., सायन रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीत सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांचा लसीविषयीचा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले असल्याचे मत जे.जे. आणि सायन रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. या रुग्णालयांमध्ये लसीची चाचणी सुरू आहे, डिसेंबर अखेरपर्यंत या लसीच्या चाचणीत हजार स्वयंसेवक सहभाग घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र हे लक्ष्य पूर्ण होत नसल्याविषयी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली.
जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीविषयी कानावर येणाऱ्या चर्चा, लसीच्या दुष्परिणामांविषयीच्या अफवा, लसीविषयी मानसिक भीती-साशंकता, लसीच्या दोन डोसमधील महिन्यांचे अंतर अशा अनेक मुद्द्यांवरून स्वयंसेवकांनी मानवी चाचणीत सहभाग घेण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे या रुग्णालयांना मानवी चाचणी पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होत असून प्रशासनाकडून देण्यात आलेले हजार स्वयंसेवकांचे लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, स्वयंसेवकांचा सहभाग कमी झालेला नाही, मात्र सुरुवातीला ज्या पद्धतीने प्रतिसाद होता त्याची गती कमी झालीय. स्वयंसेवकांची नियुक्तीची प्रक्रियाही सोपी नसून त्याकरिता प्रत्येक स्वयंसेवकाचे समुपदेशन, प्रश्नोत्तरांचे निरसन यावर वैयक्तिकपणे भर दिला जात आहे.
* सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, सायन रुग्णालयात २० दिवसांत १२० स्वयंसेवकांची लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक स्वयंसेवकांला ३० मिनिटांचा वेळ दिला जात आहे. शिवाय, लसीकरणाची प्रक्रियाही सोपी नसून या सर्व प्रक्रियेवर एथिकल कमिटीचे लक्ष आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लस चाचणीत सहभागासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच राज्य शासन वा पालिका प्रशासनाने दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात येईल असा विश्वास आहे.
......................