‘त्या मृत्यूप्रकरणाची मानवाधिकार आयोगाने चौकशी करावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:54 AM2019-11-01T01:54:13+5:302019-11-01T01:54:24+5:30
मात्र मारहाणीनंतर त्याच्यावर उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजय सिंह या तरुणाचा मृत्यू झाला आहे,
मुंबई : वडाळा येथे विजय सिंह या तरुणाच्या पोलीस कोठडीतील मृत्यूची मानवाधिकार आयोगाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी शुक्रवारी केली.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एम.ए. सईद आणि अतिरिक्त सचिव व्ही.के. गौतम यांची भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी निवेदनात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात विजय सिंह या तरुणाचा पोलीस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाला. मात्र मारहाणीनंतर त्याच्यावर उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजय सिंह या तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी आणि विजय सिंह याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तत्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
विजय सिंह या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी राष्ट्रवादीने आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आयोगाने १४ नोव्हेंबर ही तारीख दिली असून या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. आनंद काटे ही केस लढवणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे नरेंद्र राणे, संजय तटकरे, क्लाइड क्रास्टो आदी उपस्थित होते.