लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीनंतर आता शहर उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी सुरू आहे. सेंट जाॅर्ज रुग्णालयात सुरू असलेल्या या मानवी लस चाचणीत आतापर्यंत १४४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे, जानेवारीत या स्वयंसेवकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे दोन्ही लसींनंतर आता या लसीच्या निष्कर्षाकडे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नोव्हेंबर महिन्यांत सेंट जाॅर्ज रुग्णालय या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी सहभागी झाले होते. त्या वेळी १८ स्वयसेंवकांनी नोंदणी करून सहभाग घेतला, त्यापैकी सहा डॉक्टर्स होते. त्यानंतर नुकताच या रुग्णालयाने लसीचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. याविषयी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, तिसऱ्या टप्प्यातील मानवी लस चाचणी २० जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून आलेल्या निर्देशांनुसार, या लसीच्या चाचणीविषयी पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात आली होती. या लसीच्या मानवी चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सहभाग घेतला.
सुरुवातीला केवळ १०० जणांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर अनेकांनी लस घेण्याविषयी सकारात्मकता दर्शविल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढली. एकूण १४४ लाभार्थ्यांपैकी ४४ लाभार्थी हे खासगी रुग्णालयातील डॉक्टर आहेत. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष व निरीक्षणांविषयी वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सट’च्या अहवालात २० हजार लाभार्थ्यांच्या आधारे अभ्यास अहवाल मांडण्यात आला आहे, या अहवालानुसार कोविडविरोधात ही लस ९० टक्के सुरक्षित व उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनप्रमाणे या लसीचाही दुसरा डोस आवश्यक असून २८ दिवसांनंतर तो घेणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या डोसकरिता पुढील आठवड्यात सुरुवात होईल. त्यानंतर पुढील सात महिन्यांच्या कालावधीसाठी लाभार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येईल.
चौकट
स्पुटनिक व्ही लसीविषयी माहिती
* या लसीमुळे शरीरात अँटिबॉडी (प्रतिपिंड) निर्माण होतात, शिवाय रोगप्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होते.
* जागतिक वैद्यकीय जर्नल्समधील निरीक्षण आणि अभ्यासानुसार, जगातील तीन उपयुक्त लसींमध्ये या लसीचा समावेश
* १४४ लाभार्थ्यांपैकी एकाही लाभार्थ्याला दुष्परिणांना सामोरे जावे लागले नाही.