हिंसेच्या वातावरणात माणुसकीचा झरा, अडकलेल्या प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:32 AM2018-01-04T05:32:21+5:302018-01-04T05:32:53+5:30
कोरेगाव - भीमा घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक स्थानकावर अडविण्यात आलेल्या लोकलमुळे दीड ते दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागले. या हिंसेच्या वातावरणात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला.
- मनिषा म्हात्रे
मुंबई - कोरेगाव - भीमा घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक स्थानकावर अडविण्यात आलेल्या लोकलमुळे दीड ते दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागले. या हिंसेच्या वातावरणात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला. विक्रोळी ते घाटकोपर रेल्वे स्थानकलगतच्या उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टीतील रहिवाशांनी मदतीचा हात पुढे केला.
रिक्षा, टॅक्सी आणि बस बंद असल्याने चाकरमान्यांनी रेल्वेचा आधार घेतला. मात्र, सकाळपासूनच गोवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात करण्यात आलेल्या ‘रेल रोको’मुळे लोकलसेवा खोळंबल्या. डोंबिवली स्थानकात साडेअकराच्या सुमारास सुटलेल्या लोकलला मुलुंड गाठण्यासाठी ५ ते ६ तास लागले. कांजूर स्थानकात आसन खुर्च्या रेल्वे रुळावर टाकण्यात आल्यामुळे यात आणखी भर पडली. मुलुंड ते घाटकोपर दरम्यान सकाळी ६ ते ७ लोकल अडकून पडल्याने प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दुपारी विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकालगतच्या रहिवाशांनी पुढाकार घेतलेला पाहावयास मिळाला. यारहिवाशांनी लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. येथील झोपडपट्टीतील रहिवाशी पाण्याने भरलेले हंडे, कळशी घेऊन रेल्वे रुळात नागरिकांना पाणी पुरवले.
अपघातग्रस्त मायलेकीची सुटका
वाशी पुलावर डम्पर आणि टेम्पोमध्ये अपघात होऊन, टेम्पोमध्ये एक महिला दीड वर्षांच्या मुलीसह अडकून पडली होती. हे दृश्य नजरेस पडताच आंदोलन उरकून चाललेल्या भीमसैनिकांनी १० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मायलेकीची अपघाग्रस्त टेम्पोतून सुटका केली.
वाशी गावालगत काही भीमसैनिकांनी ‘रास्ता रोको’ केला होता. हा ‘रास्ता रोको’ संपल्यानंतर पुन्हा ते वाशीच्या दिशेने परत येत होते. या वेळी वाशी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणाºया मार्गावर भीषण अपघात घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.