ठाणे : वयाच्या सातव्या वर्षी रेल्वेस्टेशनवर सापडलेल्या अब्दुल रशीद शेखला रेल्वे पोलिसांनी सरकारी वसतिगृहात दाखल केले. अठराव्या वर्षांनंतर अब्दुलने जोशी-बेडेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. कुटुंबाचे प्रेम नसल्याने नेहमी तणावात असलेल्या अब्दुलला विद्यमान प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक व त्यांचे पती अॅड. आशीष नाईक यांनी आपल्या कुटुंबाचा सदस्य केले. प्रामाणिकपणा व हुशारीच्या बळावर प्रगती केलेल्या अब्दुलचा निकाह नाईक पतीपत्नीने अलीकडेच लावून दिला.
महाविद्यालयाच्या तत्कालीन उपप्राचार्या पद्मिनी मूर्ती यांनी डॉ. नाईक यांच्याकडे पाठवले होते. डॉ. नाईक उत्तम समुपदेशक असल्याने त्याच्या तणावाचे मुख्य कारण त्याला कुटुंबाची माया व हक्काचे घर नाही, हे असल्याचे त्यांनी हेरले. डॉ. नाईक यांचे पती अॅड. आशीष नाईक यांच्याशी त्यांनी अब्दुलबद्दल चर्चा केली. सुरुवातीच्या काळात एक ते दीड महिन्यासाठी आपल्या कार्यालयात त्यांनी अब्दुलला ठेवून घेतले. त्याचे स्वच्छ चारित्र्य, अभ्यासातील प्रचंड हुशारी यामुळे अल्पावधीत अब्दुल नाईक कुटुंबातील सदस्य झाला. नाईक पतीपत्नीने त्याला मुलाची माया दिली. अब्दुलला नाईक कुटुंबीयांनी पूर्ण धर्मस्वातंत्र्य दिले. अब्दुल ज्या वसतिगृहात वाढला होता, तेथे त्याच्यावर धर्मनिरपेक्षतेचे संस्कार झाले होते. नंतर, तो हळूहळू नमाज शिकला आणि नाईक यांच्या घरी नमाज पढू लागला. दिवाळी आणि ईद हे दोन्ही सण नाईक कुटुंबीयांत एकत्र साजरे होऊ लागले.
अब्दुलचा निकाह करण्यासाठी नाईक दाम्पत्याचे वधूसंशोधन सुरू होते. ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या अनाथालयातील नईमा शेख ही या तिघांना पसंत पडली. या ट्रस्टने त्यांच्या नियमानुसार अब्दुल आणि नईमाचा निकाह लावून दिला. तसेच, तिला सर्व संसारोपयोगी वस्तूंचा आहेर दिला. अब्दुलचे शिक्षण झाल्यावर तो कुरिअर बॉय म्हणून नोकरी करत होता. तसेच स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करत होता. या परीक्षेत पास होऊन आता तो सेंट्रल रेल्वे पोस्टमध्ये आॅफिसर म्हणून नोकरी करत आहे. त्याला मुलुंड येथे शासकीय सदनिका मिळाली आहे. नाईक यांची सून नईमाचा या शासकीय निवासस्थानात गृहप्रवेश झाला. नईमाने उखाणा घेतला, मंगळसूत्र घातले. अब्दुल हा नाईक कुटुंबीयांचा तिसरा मुलगा, तर नईमा ही सून आहे, असे ते सांगतात. नाईक यांच्या मुलांसोबत अब्दुलचे नाते सख्ख्या बहीणभावासारखे आहे. अब्दुलने प्रत्येक संधीचे सोने केले. कुटुंबाचा आधार मिळताच अब्दुलमध्ये जादुई बदल झाल्याचे आम्ही पाहिले आहे, असे डॉ. नाईक यांनी सांगितले.फी केली माफअब्दुलला घडवण्यात जसा नाईक कुटुंबीयांचा हात आहे, त्याचप्रमाणे विद्याप्रसारक मंडळ आणि महाविद्यालयानेही त्याला मोलाची साथ दिली आहे. त्या वेळच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी त्याची काही वेळा फी माफ केली होती. तसेच शिवाजी नाईक, नारायण बारसे, मोनिका देशपांडे, सुभाष शिंदे यांसारख्या अनेक प्राध्यापकांचा खारीचा वाटा आहे.