मुंबई : कोरोनामुळे देश लॉकडाउन झाला आहे. या कालावधीत हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजूर आणि श्रमिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोज काम करून पोट भरणाºया श्रमिकापासून असहाय वर्गातील व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. नवी मुंबई, नेरूळ आणि वाशीसह मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी गरजूंना, विशेषत: कामगार वर्गाला मोफत अन्न, धान्य आणि औषध वितरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले असून, यात उत्तरोत्तर वाढच होत आहे.
ग्लोबल शिपर्स कम्युनिटी या एनजीओद्वारे मुंबईसह राज्यभरात अन्नदानाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कम्युनिटी एक वर्ल्ड इकॉनॉमी फोरम आहे. त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे नेतृत्व सलोनी भल्ला करत आहेत. यासाठी ८ लोकांची टीम काम करत आहेत.
या उपक्रमांतर्गत लोकांना एका किटचे वितरण करण्यात येत आहे. या किटमध्ये दोन सॅनिटायझर बॉटल, तीन मास्क, डाळ, तांदूळसारख्या अन्नधान्याचा समावेश आहे. यासाठी मिलापच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. यातून उभे राहिलेले किट आतापर्यंत मुंबई आणि नवी मुंबई येथील एक हजार कुटुंबियांना वितरित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनासोबत बोलणे सुरू असून, आता राज्यभरात जे स्थलांतरित कामगार आहेत; त्यांना गरम जेवण आणि अन्नधान्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाच ते दहा हजार कामगारांना अशा प्रकारे मदत केली जाईल. पुढील आठवड्याभरात हे कामदेखील मार्गी लागेल.
विक्रोळी येथील चार्ली स्पोर्ट्स क्लबच्या वतीनेदेखील गरजू व्यक्तींना मदत केली जात आहे. तांदूळ, डाळ, तेल अशा साहित्याचे वितरण केले जात आहे. या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती विक्रोळी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शेट्टी यांनी दिली.
प्रत्येक घरात पाच व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कम्युनिटी स्वयंपाकघर अशी ही संकल्पना असून, या माध्यमातून डाळ, तांदूळ, गव्हाचे पीट, कांदे, बटाटे, तेल, साबण, कपडे धुण्यासाठी पावडर आदी साहित्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती नालासोपारा येथे राहत असलेले रामचंद्र मंडलिक यांनी दिली. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथील कामगारांना जेवणाच्या ४०० प्लेट देण्यात आल्याची माहिती तरुण कार्यकर्ता शुभम कर्णिक याने दिली.
मुंबई आणि राज्यात स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे शहर सोडता आले नाही, असे कामगार नवी मुंबई आणि मुंंबईत राहत आहेत. कोरोनामुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी त्यांना धीर देणे आणि त्यांना किरणा साहित्य देण्यासाठी काम करत आहोत.- सलोनी भल्ला, प्रकल्प समन्वयक, ग्लोबल शिपर्स कम्युनिटी, एनजीओ